Top 5 news -सरकार तूर, हरभऱ्याचे उत्पादन वाढविणार

देशात तूर, हरभऱ्यासह कडधान्याची मागणी वर्षनिहाय वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्याासाठी पिकांची उत्पादकताही वाढवावी लागेल. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मग २०३० पर्यंत देशाची मागणी किती टनांची राहिल? ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय करायला हवे?
सरकार तूर, हरभऱ्याचे उत्पादन वाढविणार
सरकार तूर, हरभऱ्याचे उत्पादन वाढविणार
Published on
Updated on

1)विदर्भात उन्हाच्या झळा वाढल्यात. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या विदर्भात उन्हाचा चटका कायम राहिल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाला पोषक हवामानये. त्यामुळे या भागांत ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. गुजरात राज्यात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थितीये. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होतेय. उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत विजा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

2. यंदा हरभरा उत्पादनात वाढ होणार असल्याचे केंद्राने म्हटले. यंदा देशात १३१ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. त्यातच आयात मोठी झाली. त्यामुळे बाजारात दर दबावात आहेत. बाजारात सध्या ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांदरम्यान दर मिळतोय. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला शेतकरी पसंती देत आहेत. आत्तापर्यंत सरकारने हरभऱ्याची हमीभावाने १ लाख ६८ हजार टन खरेदी केली. यात गुजरातमधील ८२ हजार टन मालाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ७१ हजार टन हरभरा नाफेडला विकला. कर्नाटक राज्यातही १५ हजार टनांची खरेदी झाली. हमीभावाने हरभरा खरेदी वाढली. त्यामुळे बाजारात दराला आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं. 

हे हि पहा : 

3. साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. मात्र यंदा येथील उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा येथील उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावेल, असे जाणकारांनी सांगितलं. येथील कारखान्यांनी इथेनाॅल निर्मितीला पसंती दिली. तसेच किड-रोगाचाही प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे येथील साखर उतारा कमी राहिल. २०१८-१९ मध्ये उत्तर प्रदेशात साखर उतारा ११.४६ टक्के होता. तो कमी होऊन २०१९-२० मध्ये ११.३० टक्क्यांवर आला. तर २०२०-२१ मध्ये १०.७६ टक्क्यांचा उतारा मिळाला. यंदा मात्र साखर उतारा १०.०४ टक्के मिळाला तरी पुरे, अशी स्थिती आहे. तसेच सध्या तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. तापमान एवढे राहिल अशी अपेक्षा नव्हती. या तापमानामुळेही सरासरी उत्पादकता कमी राहू शकते, असे जाणकारांनी सांगितले. 4. भारत गरजेच्या ६५ टक्के खाद्यतेल आयात करतो. मात्र मागील दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दर वाढले. त्यामुळे भारताचा आयातीवरील खर्चही वाढला. मात्र यंदा तर खाद्यतेलाची मोठी टंचाई भासतेय. यामुळे तेलाचे दर गगणाला भीडले. म्हणून सरकारने देशात पाम लागवडीला प्रोत्सहन देण्याचा निर्णय घेतला. तेलंगणात ५० हजार एकरवर पामची लागवड होणार आहे. करीमनगर जल्ह्यातील शेतकरी लागवडीसाठी पुढे आले.  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फलोत्पादन विभाग अभियान राबवित आहे. पाम झाडांची लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षापासून उत्पादन सुरु होते. एकदा लागवड केली की २२ वर्षापर्यंत उत्पादन मिळते, असे येथील फलोत्पादन विभागाने सांगितले.  

5. भारतात लोकसंख्या वाढीचा दर अधिक आहे. त्यामुळे वर्षागणिक देशातील अन्नधान्याची मागणी वाढत आहे. वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला, असे सरकारने सांगितले. कडधान्याचा विचार करता सध्या देशाचा वापर २६७ लाख २० हजार टनांचा आहे. तर उत्पादन २६९ लाख ६० हजार टन होण्याचा अंदाज आहे. मात्र २०२९-३० या आर्थिक वर्षापर्यंत देशाची गरज झपाट्याने वाढेल. या वर्षात देशाची गरज ३२६ लाख ४० हजार टनांवर पोचेल, असा अंदाज आहे. ही मागणी पुर्ण करण्यासाठी काय उपाय करावेत, हे सुचविण्यासाठी केंद्राने एक समिती स्थापन केली. या समितीला २०३३ पर्यंत देशात विविध शेतीमाल, पशुधन आणि कृषि निविष्ठांची मागणी तसेच पुरवठ्याचा अंदाज व्यक्त करण्याचे काम दिले होते. देशात कडधान्याची मागणी आणि उत्पादन दरवर्षी वाढले, असे या समितीच्या अहवालावरून दिसते. तसेच उत्पादन वाढीसाठी पिकाची उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, असे अहवालात म्हटले आहे. यासाठी देशातील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली. देशात सध्या पिकांची उत्पादकता खूपच कमी आहे. २०२१-२२ मध्ये खरिपातील कडधान्य पिकांची उत्पादकता सरासरी ६१४ किलो प्रतिहेक्टर होती. तर रब्बीत १ हजार ११२ किलो राहिली. हंगामाची दोन्ही हंगामातील सरासरी ८८८ किलोवर राहिली. एकिकडे उत्पादकता वाढतेय. मात्र शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे सरकारच्या या प्रयत्नाला यश मिळेल का? हा प्रश्न आहे. कारण सरकार आयात करून देशात दर पाडण्याचे काम करते. त्यामुळे शेतकरी सरकराच्या आश्वासनावर विश्वास ठेवतील, असं वाटत नाही, असे जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com