1. राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागलीय. एरवी राज्यात महाशिवरात्रीपासून गरमीला सुरुवात होते. पण यंदा एक ते दिड आठवडा आधीपासूनच उकाडा वाढलाय. गेल्या दोन दिवसात सोलापूर आणि अकोला या शहरांमध्ये देशातलं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. हा उकाडा अजून काही दिवस जाणवण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे माजी शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय.
2. केंद्र सरकारच्या शेतीमाल निर्यात धोरणाच्या धर्तीवर राज्याचं स्वतंत्र शेती निर्यात धोरण आज जाहीर करण्यात आलं. त्यानुसार राज्याला कृषी निर्यातीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी 21 क्लस्टर तयार करण्यात येणारेत. हे क्लस्टर कृषी हवामान विभागांवर आधारित असतील. तसंच स्वदेशी, सेंद्रिय, पारंपरिक कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं जाणारे. त्याचबरोबर निर्यातवाढीसाठी पायाभूत सुविधा उभारणं आणि उपलब्ध सुविधांचा वापर वाढवला जाणारे. तसंच नवनवीन देशांमध्ये निर्यात वाढवण्याच्या उद्दीष्ट ठेवण्यात आलंय.
3. तेलबियांची वार्षीक वाढ 4 टक्क्यांनी झाल्यास 2030 पर्यंत भारत खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो, असं मत सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात सोपाचे अध्यक्ष दाविश जैन यांनी व्यक्त केलंय. त्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनसाठी भरीव आर्थिक तरतुद करावी. त्याची अंमलबजावणी करावी, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलंय. काल केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी क्षेत्रावर पडलेला प्रभाव, या विषयावर झालेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
4. इथेनॉलनिर्मिती क्षेत्रात देशातील यंदाची उलाढाल गेल्या हंगामाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढेल. ऑक्टोबरअखेर ही उलाढाल ३० हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या सूत्रांनी दिली. देशात २०२१-२२ या वर्षासाठी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा अंदाजे ४३७ कोटी लिटर इथेनॉलची गरज तेल विपणन कंपन्यांना भासेल. त्यापैकी ४२० कोटी लिटरचा पुरवठा स्वीकारण्यासाठी कंपन्यांनी निविदा प्रक्रिया जारी केल्या आहेत.
हे हि पहा :
5. महिन्याच्या सुरुवातीला राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये कापसाचे सर्वात जास्त व्यवहार ज्या भावानं होतात, ते सर्वसाधारण भाव 10000 रुपये क्विंटलच्या घरात होते. पण महिना संपत आला तशी कापसाच्या सर्वसाधारण भावांमध्ये काहीशी नरमाई पाहायला मिळतीय. गेल्या आठवडाभराचे भाव पाहता सिंदी, सेलू, उमरेड, मानवत, किल्ले धारूर, परभणी, आणि चिमूर बाजार सोडता सर्वसाधारण भाव 10000 च्या आत राहिल्याचं दिसलं. या आठवड्यात राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांपैकी पुलगाव बाजारात सर्वसाधारण भाव 9400 च्या वर तर देऊळगाव राजा बाजारातले भाव 9800 च्या वर होते. असं असलं तरी शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्यानं विक्री सुरू ठेवल्याचं दिसतं. त्यामुळे भावात नरमाई आली तरी कापसाच्या आवकेत मात्र कुठलाच मोठा चढ उतार झालेला नाही. त्यात कापूस बाजाराची मूलभूत परिस्थिती अजूनही कमीअधिक प्रमाणात तशीच असल्यानं महत्त्वाच्या बाजारांमध्ये भाव साडेनऊ हजाराच्या खाली गेलेले नाहीत. यंदा देशांतर्गत कापसाचं उत्पादन घटलं असून आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय कापसाला मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे भावांना आधार मिळताना दिसतोय. आपल्याला कोणत्या पिकाच्या मार्केटबद्दल जाणून घ्यायला आवडेल, आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्याला ही बातमी आवडली असेल, तर एक लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा. पुन्हा भेटूच, तोवर पाहात राहा, ॲग्रोवन डिजिटल!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.