सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या शेतकऱ्याचा लागवडीचा प्रयोग

पारंपरिक शेती न करता फळबाग लागवडीचे प्रयोग करण्याची एक आवड आहे. सध्या सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यास फळधारणा झाली हीच आमच्यासाठी उत्साहवर्धक बाब म्हणायला हवी. - बाळासाहेब देवरे, शेतकरी, वाजगाव, जि. नाशिक
वाजगाव येथील शेतकरी केवल कडू देवरे यांनी प्रयोग म्हणून अर्धा एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली होती. आता या सफरचंदास फळधारणा होत आहे.
वाजगाव येथील शेतकरी केवल कडू देवरे यांनी प्रयोग म्हणून अर्धा एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली होती. आता या सफरचंदास फळधारणा होत आहे.

नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर आहे. आता देवळा तालुक्यातील वाजगाव येथील केवळ कडू देवरे या शेतकऱ्याने मागील वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर ‘हरमन-९९’ या सफरचंद जातीची लागवड केली. चालू वर्षी काही झाडांना काही प्रमाणात फळधारणा झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

देवरे कुटुंबीयांची एकूण ७० एकर शेती असून सहा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. विविध फळ पिकांची लागवड करून यशस्वी उत्पादन घेण्याचा त्यांचा ध्यास असतो. यापूर्वी त्यांनी ३५ एकर क्षेत्रावर आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, डाळिंब व द्राक्ष फळपिके घेतली आहेत. यानंतर त्यांनी सफरचंद पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला आहे. जून २०१९ मध्ये जम्मू येथील हरमन ९९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जातीची रोपे त्यांनी मध्यस्थांकडून आणली. त्यांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली. मध्यंतरीच्या काळात काही झाडे वाळली. सध्या बागेत सुमारे दोनशे झाडे आहेत.

लागवडीसाठी ही कलम रोपे जम्मू भागातून विमानाद्वारे नाशिकला आणण्यात आली होती. त्यानंतर लागवडीसाठी शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर करून खड्डा भरण्यात आला होता. पीक संरक्षणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करण्यात आला आहे. लागवडीपश्चात दोन वर्षांनंतर फळधारणा अपेक्षित असल्याचे देवरे यांना सांगण्यात आले होते. मात्र, एक वर्षानंतर तुरळक झाडांना एक, दोन ते तीन या प्रमाणात फळधारणा दिसून आली आहे. मात्र आगामी वर्षात चांगली उत्पादकता शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.    लागवडीचे टप्पे 

 • एप्रिल २०१९ : कलम रोपांसाठी श्रीनगर (काश्मीर) येथे फलोत्पादन रोपवाटिकेत नोंदणी 
 • जून २०१९ : रोपांची उपलब्धता झाल्यानंतर लागवड
 • जुलै २०२० : काही प्रमाणात फळधारणा 
 • काही प्रमुख निष्कर्ष 

 • मे २०२० अखेर कडक ऊन असताना पाने व शेंडे काही प्रमाणात पिवळी पडली. यामध्ये फेरसटी कमतरता दिसून आली. मात्र त्यानंतर फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट देऊन पिवळी पाने कमी करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिल्यानंतर प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला. 
 • रोग व किडीचा अद्याप प्रादुर्भाव नाही.
 • नत्र उपलब्धता व सुपीकतेसाठी हिरवळीचे खत म्हणून तागाची पेरणी केली आहे. त्यातून गरजेनुसार नत्राची उपलब्धता झाली आहे. 
 • सुरुवातीला आलेल्या फळांचा रंग गडद गुलाबी व हलकासा पिवळा. 
 • मध्यम आकाराचे व अजून पूर्ण पक्व न झालेले फळ चवीसाठी तोडले असता ते रवेदार व मध्यम गोड.
 • हा प्रयोग असल्याने काही निष्कर्ष तपासणी सुरू आहे. 
 • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com