
पुणे - "मी चार गायी विकल्या आणि चार एकर जमीन विकत घेतली. पण आज ते अशक्य आहे, कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत", शेतीच्या आठवणींना उजाळा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांनी हे विधान केले आहे. औंध येथे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यात पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ प्रयोगशाळा (Biosecurity Laboratory) उभारणी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस (Poultry and viral vaccines) उत्पादन प्रयोगशाळेच्या नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar), पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datatray Bharane) यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा - इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाच्या साठ्यात भरीव वाढ
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नवाढ करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेत निर्मित होणारी लस महत्वाची भूमिका बजावेल.
कोरोना प्रतिबंधक (Covid Vaccine) लसीमुळेच कोरोनाची तिसरी लाट आपण बऱ्यापैकी थोपवू शकलो. माणसाला कोरोना, पोलिओसारख्या रोगांपासून वाचवण्यात, प्रतिबंधक लशींनी जी भूमिका बजावली, त्याच धर्तीवर लशींचे संशोधन, उत्पादन व वापर करुन येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे पशुधन रोगांपासून वाचवायचे आहे. पशुधन क्षेत्रातल्या वाढीसाठी जनावरांतल्या सांसर्गिक रोगावर नियंत्रण आवश्यक आहे. पशुधन, पाळी व प्राणी आणि वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. पशु लसीकरणाचे महत्व अधिक आहे. लसीकरणामुळे या रोगाचा प्रतिबंध करता येणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
लसीकरणाशिवाय उत्पादन वाढ अशक्य -
जनावरे आणि कोंबड्यांचे (Chicken) आरोग्य तसेच दूध, अंडी आणि मांसांच्या (Milk, Egg, Meat Production) उत्पादन वाढीकरिता लसीकरणाचा मोठा उपयोग होतो. जागतिक कृषि संस्थेच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी २०५० पर्यंत अन्न उत्पादनात ७० टक्के वाढ आवश्यक आहे. यामध्ये प्राणीजन्य पदार्थांचा वाटा मोठा असून लसीकरणाशिवाय ही उत्पादनवाढ अशक्य आहे.
पशुरोगाचे होणार नेमके व अचूक निदान -
जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.
कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा - राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ६१ कोटी २८ लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
दूधाचे आणि दूग्धजन्य पदार्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगल्या दुधाळ जातीच्या, चांगल्या वंशांच्या जनावरांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्यामार्फत ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे १० वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असून या माध्यमातून राज्यात शुद्ध गीर प्रजातीची पैदास करण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच पशुसंवर्धन विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
पुशंसवर्धन मंत्री केदार म्हणाले, एव्हीएनएन्फ्लूएन्झा, ब्रुसेलोसिस, रेबीज इत्यादी आणि सीसीएचएफसारख्या प्राण्यांपासून माणसाला होणाऱ्या आजारांचे निदान करण्यासाठी बीएसएल 3 ची सुविधा आवश्यक आहे. प्रयोगशाळेच्या निर्मितीचा ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प आरकेव्हीवाय अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्याला आणि शेतीशी निगडीत काम करणाऱ्यांना पशूपालन हा उत्पन्नाचा शाश्वत मार्ग आहे. मात्र पशुआरोग्य हा पशुधन व्यवसायाचा मुख्य कणा आहे.
रोगांच्या प्रादुर्भावामुळे पशुधनाच्या आरोग्यावर, उत्पादनावर परिणाम होतो. पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचे रक्षण तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी आवश्यक ठरते. जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देताना, त्यांचे वेळेत लसीकरण करुन घेतले पाहिजे. त्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरणार असल्याचे केदार म्हणाले.
तर जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टळणार आहे. प्रयोगशाळा शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल, असे राज्यमंत्री भरणे म्हणाले.
अजितदादांचा शेतीच्या आठवणींना उजाळा -
राजकारणात येण्यापूर्वीच्या आपल्या शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार म्हणाले की, दत्ता भरणे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझा भाऊही त्यांच्यासोबत होता. माझे वडिल आम्हाला लवकर सोडून गेले. त्यानंतर माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मग मी शेती करायला लागलो. मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले. तुमचा विश्वास बसणार नाही. त्या काळामध्ये एक गाय विकली तर त्या किमतीतून एक एकर जमीन विकत घेत होतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या बांधाच्या समोर चार एकरांचा एक प्लॉट विकायला निघाला होता. मी चार गायी विकल्या आणि त्या पैशातून मला चार एकर जमीन मिळाली. पण आज ते अशक्य आहे कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. हे मी स्वतः अनुभवले आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे, अशा शब्दात अजिक पवारांनी आपल्या शेतीच्या आठवणी सांगितल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.