अनर्थ...

आपल्या हातात कसलंही नियंत्रण नसताना प्रामाणिकपणे शेतात राबणारा शेतकरी आणि तुझी चिकाटी सारखीच.'' राजा काही बोलला नाही. त्याला मौनात राहून प्रेत आणायचं होत. मला माहित आहे राजन, तू बोलणार नाहीस. पण शांतपणे चालत जाण्यात काय मजा आहे? हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून, मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐक... असं म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.
Anartha
Anartha
Published on
Updated on

नुकत्याच निघून गेलेल्या वेताळामुळे हलका झालेला राजा माघारी फिरला आणि परत झाडावर चढून प्रेत फांदीवरून खाली उतरवलं. त्याला पाठुंगळी मारून चालू लागला. विकट हास्य करत वेताळ म्हणाला, ‘‘राजा, तुझी चिकाटी म्हणजे कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यासारखी आहे. आपल्या हातात कसलंही नियंत्रण नसताना प्रामाणिकपणे शेतात राबणारा शेतकरी आणि तुझी चिकाटी सारखीच.'' राजा काही बोलला नाही. त्याला मौनात राहून प्रेत आणायचं होत. मला माहित आहे राजन, तू बोलणार नाहीस. पण शांतपणे चालत जाण्यात काय मजा आहे? हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून, मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐक... असं म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.  

आटपाट नगरात ज्योतिबा नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर बागायती शेती होती. बारमाही पाणी देणाऱ्या विहिरींच्या कृपेने हा सुपीक तुकडा वर्षभर पाणी प्यायचा. ज्योतिबाचं सगळं आयुष्य गावातच गेलं. कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासली नाही. शेतात घाम गाळायचा. पहाटे चार वाजता उठून गोठ्यापासून दिवसाला सुरवात करायची. दिवसभर शेतात राबायचं, संध्याकाळी घरी येऊन जेवण करायचं, रात्री भजनाला बसायचं आणि घरी येऊन बिनघोरपणे झोपून जायचं. अशा आखीव दिनचर्येमुळे तब्येत उत्तम होती. कधी दवाखान्याची पायरी चढायची वेळ आली नाही. ज्योतिबावर लहानपणापासूनच महात्मा फुलेंच्या विचाराचा प्रभाव. घरच्या परिस्थितीमुळे जास्त शिकता आलं नाही, पण गावातल्या शाळेत तो दहावीपर्यंत शिकला होता. आयुष्यभर त्याने फुलेंच्या विचारांचा अंगीकार केला. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले। ही म. फुलेंची शिकवण ज्योतिबा विसरला नाही. अविद्येमुळे अवमूल्यन होऊ नये म्हणून ज्योतिबाने मुलाला शिकवलं. पोरगा बारावीपर्यंत शिकला. पुढे शेतकी डिप्लोमा करून शेतात आला. त्याला देखील शेतीची आवड होती. पण त्याच्या पुस्तकी शेतीमुळे बापाबरोबर त्याचे खटके उडू लागले. 'तुमचा काळ जुना होता. आता शेती आधुनिक झालीये' म्हणत तो ज्योतिबाच्या सूचना ऐकेनासा झाला. ज्योतिबाचा स्वाभिमान त्याच्या या वक्तव्याने दुखावला जायचा. ‘‘तुमच्या पिढीला काय कळतंय शेतीतलं, चार बुकं शिकली म्हणजे शेती करता येते का? इथं आमचे काळ्याचे पांढरे झालेत शेतीत, आणि आम्हाला तुम्ही शेती शिकवताय का?'' असं म्हणत तो आपल्या दुखावलेल्या स्वाभिमानावर मलमपट्टी करायचा.

हेही वाचा - शाळा आणि शेतीशाळा

पोराचे आणि ज्योतिबाचे जरा जास्तच खटके उडू लागले. ज्योतिबा शेवटी शेतीतून रिटायर झाला. मुलाच्या हातात शेतीची कामं दिली आणि स्वतः आषाढी-कार्तिकीची वारी, संध्याकाळी भजनी मंडळ, अधूनमधून अखंड हरिनाम सप्ताह असं देवधर्माला वाहून घेतलं. मुलाच्या हातात शेतीचं सुकाणू आल्यावर, त्याने धडाधड बदल करायला सुरवात केली. बैलजोडी परवडत नाही, त्यांचं चारापाणी करा, गोठ्यात सफाई करा, यात वेळ वाया जातो. आजकाल ट्रॅक्टर (Tractor) आले आहेत. आपण बैलजोडीला रजा देऊन ट्रॅक्टर घेऊया असं त्याने ठरवलं. ‘‘अरे, आपल्या पाच एकर शेतीसाठी कशाला हवा ट्रॅक्टर? त्यापेक्षा भाड्याने आणूया की,'' असं म्हणत ज्योतिबाने विरोध केला. पण मुलाने तो मोडून काढत कर्ज काढून ट्रॅक्टर दारात आणला. आता बैल गेल्यावर, फक्त गाय आणि म्हशींसाठी कशाला शेण काढत बसायचं. पिशवीतून दूध मिळतंच की, असं म्हणत मुलाने गाय, म्हैस बाजारात नेऊन विकल्या.   ट्रॅक्टर आला खरा, पण घराची आर्थिक घडी विस्कटू लागली. बैल शेतात राबायचे. ते डिझेल पिऊन काम नाही करायचे. शेतातच उगवणारा चारा त्यांचं इंधन. बरं बैल आणि गाय, म्हैस यांपासून मिळणाऱ्या शेणामुळे जमिनीला खत मिळायचं. जमिनीचा कस टिकून राहायचा. त्याच खतावर शेतकऱ्याचं आणि बैलाचं अन्न पिकायचं. गाई, म्हशींमुळे रसायनविरहित दूधतूप मिळायचं. घरातील थोरामोठ्यांची प्रोटीन आणि खनिजांची कमतरता त्यामुळे भरून निघायची. तब्येती चांगल्या राहायच्या. पूर्वी पैशाची जास्त गरज भासायची नाही. बैलांना शेतातीलच चारा मिळायचा. डाळीसाळी, कांदा, लसूण भाजीपाला शेतातच उगवायचा. शिरपाच्या गुऱ्हाळावर पायलीभर बाजरी दिली की गुळाची भेली मिळायची. आपल्या शेतातील तीळ, भुईमूग घाण्यावर नेऊन पिळून आणला की तेल आणि दुभत्या जनावरासाठी पेंड मिळायची. मुलांना खाऊसाठीही या प्रोटीनयुक्त पेंडीचा उपयोग व्हायचा. बलुतेदारांना वर्षाकाठी धान्य दिलं की केरसुणी, मडकं, चप्पल यासारख्या वस्तू मिळायच्या. या सर्वासाठी ज्वारी, बाजरी, गहू किंवा तांदूळ हेच चलन होत. पावशेर धान्य दिलं की वाण्याच्या दुकानातून देखील हवं ते मिळायचं. एवढंच काय पण, ताडी आणि हातभट्टी सारखं देशी पेय विकत घ्यायला देखील हे देशी चलन चालायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे चलन शेतात उगवायचं आणि त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण होती. पैसा गौण होता. एक ट्रॅक्टर घेतल्यानं हे गणित बदललं. ट्रॅक्टर चारा खाऊन काम थोडंच कारणार होतं. त्याला प्यायला डिझेल पाहिजे. वेळोवेळी मेंटेनन्स करायला हवा. त्याचा कर्जाचा हप्ता फेडायला हवा. त्यासाठी पैसे हवेत. दूध- तूप दुकानातून विकत आणायचं. त्याच्यासाठी कॅश हवी. घरातले गाय, बैल शेतातील चारा खाऊन शेण द्यायचे. हे शेण, गोठ्यातील गोमूत्रात भिजलेला आणि अंगणात पडलेला पालापाचोळा वर्षभर उकिरड्यावर पडत राहायचा. वर्षाकाठी उकिरड्यावर बनलेलं कंपोस्ट खत दरवर्षी शेतात पडायचं. आता खत दुकानातून आणावं लागतं. त्यासाठी परत पैसा हवा. सगळीकडे पैसे मोजावे लागत असल्याने, पैसे मिळणारी पिकं घेणं भाग होतं. डाळीसाळी, घरासाठी भाजीपाला शेतात येईनासा झाला. मग तो बाजारातून आणणे क्रमप्राप्त होतं. आता पैसा मोठा झाला होता. नवीन जमान्यात फुलेंची उक्ती बदलली होती. ट्रॅक्टरमुळे बैल गेले। बैलाविना खत गेले। खताविना कस गेला। निकसामुळे रसायन आले। रसायनामुळे परावलंबित्व आले। एवढे अनर्थ बैल नसल्यामुळे झाले। ‘‘हे राजन, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. ज्योतिबाच्या मुलाने शेतीत हे आधुनिक बदल घडवणे योग्य होतं का? या बदलांमुळेच त्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली का? मग नवीन तंत्रज्ञान वापरणं अयोग्य आहे का? या प्रश्नांची उत्तर नाही दिली नाहीत, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील हे लक्षात ठेव.'' काही क्षण विचार करून राजा बोलू लागला, ‘‘वेताळा, ज्योतिबाच्या मुलाने परिस्थितीचा अंदाज न घेता आततायीपणे निर्णय घेतला. जी गोष्ट भाड्याने आणता येते तिच्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी होणं शहाणपणाचं नाही. ट्रॅक्टरसाठी त्याची शेती मोठी नव्हती. एकदा का गाडी, ट्रॅक्टर किंवा कोणतंही मशीन घरात आलं की खर्च सुरु होतात. त्यांच्या कर्जाचा हप्ता, सर्व्हिसिंग-मेंटेनन्स, पेट्रोल-डिझेलचा खर्च सुरु होतो. खोट्या प्रतिष्ठेपायी खर्च वाढवण्यापेक्षा भाड्याने मशीन घेऊन गरज भागवता येते. कर्जाच्या व्याजात ड्रायव्हरसह कार, ट्रॅक्टर भाड्याने घेणं शक्य आहे. घरात गोधन असावं. त्यामुळे रसायनविरहित दुध-तुप मिळते. जमिनीला खत मिळते. शेतात उगवलेल्या चाऱ्यावर ही जिवंत मशीन काम करतात. आधुनिक आणि पारंपरिक शेतीचा सुवर्णमध्य साधून, आपल्या पिंडाला, हवामानाला मानवेल अशी मार्केटिंग आणि अर्थशास्त्र सांभाळून सम्यक शेती त्याने करायला हवी होती.'' ‘‘अगदी समर्पक उत्तर दिलंस, राजन. तुझ्यासारखा राजा मिळाल्यास प्रजेचं भलं होणार, यात शंका नाही. पण तू बोललास आणि फसलास. व्रत तोडलंस. त्यामुळे मी निघालो,'' असं म्हणत वेताळ विक्रमादित्याच्या पाठीवरून प्रेतासह उडाला आणि परत झाडावर जाऊन लटकला. --------- (लेखक ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक आणि  ड्रीमर अँड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com