मिश्रा पितापुत्रांमुळे भाजपसमोर धर्मसंकट !

विशेष तपास पथकाने (SIT) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra ) यांच्या मुलासह एकूण १४ जणांवर ५००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आता अजय मिश्रा यांची पाठराखण भाजपला गोत्यात आणणारी ठरू शकते.
modi-and-yogi-
modi-and-yogi-

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि भाजपसमोरील अडचणीत वाढ झाली होती, मात्र आता तर भाजपसमोर धर्मसंकटच उभे राहिले आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT)  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra ) यांच्या मुलासह एकूण १४ जणांवर ५००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आता अजय मिश्रा यांची पाठराखण भाजपला गोत्यात आणणारी ठरू शकते.   

या आरोपपत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासकट १४ जणांची नावे आहेत. आशिष मिश्रावर हत्या, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रांसह दंगल माजवणे आदी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. 

३ ऑक्टोबर २०२१ रोजी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्यावेळी आशिष मिश्रा घटनास्थळी हजर होता, असेही या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. जर न्यायालयाने दोषारोपपत्र स्वीकारले तर या प्रकरणाचा खटला न्यायालयाने दिलेल्या तारखेला सुरू होईल.  

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील समीकरणांवर लक्ष्य केंद्रित केल्यामुळे आजवर भाजपने अजय मिश्रा यांच्या केंद्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी सिरीयसली घेतली नव्हती. संयुक्त किसान मोर्चा Sanyukt Kisan Morcha आणि विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या मिश्रांच्या उचलबांगडीच्या मागणीस केराची टोपली दाखवली गेली. मात्र आता एसआयटीच्या आरोपपत्रानंतर भाजपला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. 

न्यायालयाच्या अखत्यारीतील तपास यंत्रणेच्या आरोपपत्रानंतर भाजपला अजय मिश्रांची पाठराखण करत राहणे परवडणारे नाही. आजवर भाजकडून तशी भूमिका घेण्यात आली,  कारण त्यांना उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा माहोल बिघडू द्यायचा नव्हता. भाजपला यापुढे तसे करून चालणार नाही.  आधीच उत्तर प्रदेशातील वातावरण भाजपसाठी ऑलवेल आहे, असा दावा स्थानिक नेतेही करू शकणार नाहीत. उत्तर प्रदेशातील मतदार योगींच्या कारभाराबाबत समाधानी नाहीय, त्यातच या मिश्रा पितापुत्रांनी भाजपच्या अडचणीत भर टाकली आहे.

या निवडणुकीत लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण पक्षाला जड जाणार असल्याचा अंदाज अमित शहा यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांच्याकडे वर्तवला असल्याचे सांगण्यात येतेय. त्यात आता मिश्रा पितापुत्राची पाठराखण हाच विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी हिंसाचाराचा मुद्दा पहिल्यांदा आक्रमकपणे उपस्थित केलेल्या काँग्रेसकडून तशी रणनीती आखण्यात येत असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेश प्रचाराची धुरा वाहणाऱ्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी त्यांच्या सभांमधून याबाबतचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य भर शेतकरीविरोधी पंतप्रधान असाच असणार आहे. 

राज्यातील ब्राह्मण मतदारांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी अजय मिश्रांची हकालपट्टी टाळणाऱ्या भाजपला आता हा मुद्दा अधिक अडचणीत आणण्याची शक्यता असल्याचे भाजपचे उच्चपदस्थ नेतेही खाजगीत मान्य करताहेत. धार्मिक अन जातीय आधारावर निवडणुकीचे गणित घातलेल्या भाजपने आजवर विरोधकांच्या मागण्यांकडे वा आरोपांकडे दुर्लक्ष केलेले आहे. मात्र मिश्रा पितापुत्रांमुळे भाजपचं मतदानातील गृहीतक बिघडणार असेल तर भाजपकडून वेगळा विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे भाकीतही वर्तवण्यात आले आहे.  

पुराचे पाणी गळ्यापर्यंत आल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिल्लाच्या डोक्यावर बसणाऱ्या माकडाची गोष्ट तर आपल्याला ठाऊकच आहे त्यामुळे भाजपकडून आणखी किती काळ अजय मिश्रांची पाठराखण होणार? हा प्रश्नही आता निकाली निघण्याची शक्यताय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com