शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू 

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२) दिवसभर झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो घरे अजूनही पाण्याखाली असून, कित्येक घरांना पाण्याचा वेढा कायम आहे.
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू  Hundreds of homes submerged; Woman dies due to pain
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू  Hundreds of homes submerged; Woman dies due to pain
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२) दिवसभर झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो घरे अजूनही पाण्याखाली असून, कित्येक घरांना पाण्याचा वेढा कायम आहे. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. कनेडी येथील मल्हार पूल कोसळल्यामुळे दहाहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. घरावर दरड कोसळून दिगवळेतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे पुन्हा पुराचे पाणी वाहू लागले आहे. पुराच्या पाण्यामुळे ठप्प झालेली वाहतूक काही प्रमाणात शुक्रवारी (ता. २३) सुरू झाली आहे. शेकडो घरे, गोठे कोसळले आहेत. रस्ते खचण्याचे प्रकार पावसामुळे अनेक घडले आहेत. डोंगर खचल्यामुळे कित्येक घरांना धोका निर्माण झाला आहे. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली आहे. शुक्रवारीसकाळपासून पावसाचा जोर गुरुवारच्या तुलनेत कमी झाला आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी मध्यरात्रीपासून अधिकच वाढला. गुरुवारी दिवसभर संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे मुळतःच पुराच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्व नद्यांनी पूररेषा सकाळीच ओलांडली. त्यानंतर दिवसभर संततधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्गावरील पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे शेकडो वाहन चालक रस्त्यातच अडकून पडले होते. दुपारनंतर पूरस्थिती अधिकच गंभीर बनली. खारेपाटण, कणकवली, कलमठ, नाटळ, खारेपाटण जैनवाडी यासह विविध भागातील शेकडो घरांना पाण्याने वेढले. कित्येक घरांमध्ये शिरलेले पुराचे पाणी अजूनही ओसरलेले नाही. खारेपाटण शहरात अजूनही दहा ते पंधरा फूट पाणी आहे. त्यामुळे अनेक इमारतीचा एक मजला पाण्याखाली आहे. येथील शेकडो लोकांनी अन्यत्र आश्रय घेतला आहे.  मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण आणि वागदे पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान वागदे येथे शुक्रवारी सकाळी पुन्हा पुराचे पाणी आले, त्यामुळे पुन्हा या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कणकवली तालुक्यातील कनेडी-नरडवे मार्गावरील मल्हार पूल पुरामुळे कोसळला. त्यामुळे नाटळ, दिगवळे, या भागातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावर भूस्खलन झाले असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर कुडाळ तालुक्यातील कातवण कुंदे मार्ग देखील खचला आहे. आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या गावांचा संपर्क तुटलेला आहे. चिपी-कोरजाई वेगुर्ला आणि शिरशिंगे (ता. सावंतवाडी) येथील डोंगर खचले आहेत. दिगवळे (ता. कणकवली) येथील एका घरावर दरड कोसळल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर गुरुवारच्या तुलनेत कमी झाला आहे. मात्र पूरस्थिती कायम आहे. 

सिंधुदुर्गमधील पूरस्थिती

  • दीडशेहून अधिक घरे, इमारतींमध्ये पुराचे पाणी 
  • अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले 
  • कनेडी येथील मल्हार पूल कोसळला 
  • खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याचा वेढा 
  • शिरशिंगे गोठवेवाडी आणि चिपी कोरजाई डोंगर खचला 
  • कसवण कुंदे आणि खारेपाटण-गगनबावडा मार्ग खचला
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com