
मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला.
विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आभाराचा ठराव मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही टोले लगावले. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर खडसे यांनी हे वक्तव्य केले.
विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला, पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला आणि सत्तेत का आले ते कळले नाही. आई म्हणते "बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उतराई", तसे आता वड्डेटीवार यांना विखेंना म्हणावे लागेल ‘‘तुझा होऊ कसा उतराई’’ अशा मिश्किल शैलीत श्री. खडसे यांनी वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले. या वेळी श्री. खडसे म्हणाले, की मी सत्ताधारी पक्षात आहे हे कधी कधी मी विसरून जातो, विरोधी पक्षनेत्याचे गुण अजून माझ्यातून गेलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कधी कधी वाटत असेल की मी विरोधी पक्षात जातो की काय, पण मी विखे पाटील यांचा आदर्श ठेवणार नाही, मी करायचे असते तर आधीच पक्षांतर केले असते. आता पक्षांतर करणार नाही, असे सांगत त्यांनी मी विखे यांची पक्षांतराची परंपरा सुरू ठेवणार नाही, असा टोला विखे यांना लगावला.
गिरीश महाजन आत्ता आले, आधी ते निर्णयाच्या प्रकियेत नव्हते. ते जवळ झाले, विखेंना मंत्रिपद मिळाले आणि मुनगंटीवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असे सांगत त्यांनी गिरीश महाजन आणि मुनगंटीवार यांनाही चिमटा काढला. सरकार विरोधात वातावरण निर्मिती करून आपले सरकार आले पाहिजे ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका, भाजपचे सरकार येण्यात (आधीच्या) विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्त्वाची होती, असे सांगत स्वतःवर झालेल्या अन्यायाबाबत अप्रत्यक्षपणे खडसे यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली. मात्र आता आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरले आहे. आमच्यात नेमके काय ठरलंय, ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे. काय ठरलेय ते सांगा अशी मागणी सदस्यांनी केल्यावर, उद्धवजींना तेच म्हणतो काय ठरले ते सांगा, मुख्यमंत्री कुणाचा हा वादविवाद त्यामुळे होणार नाही, असा उपरोधक सल्ला देत खडसे यांनी विषयाला बगल दिली.
`तुम्ही फोडाफोडीचे राजकारण करू नका`
काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ही घोषणा केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू होती. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सरकारचा कारभार नीट चालावा यासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याचीही गरज असते. धोरणात्मक विरोध करून विजय वडेट्टीवार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावतील अशी खात्री आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संधी देतो आणि निवडणूक संपल्यावर त्यांना बाजूला करून दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुढेही वडेट्टीवार यांना संधी द्यावी असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या कुणाला तरी संधी द्यायची असे करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच तुम्ही फोडाफोडीचे राजकारण करू नका असे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी मिश्किल उत्तर दिले. फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत ते आठवा असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.