कोल्हापूरच्या उन्हाळी नाचणी प्रयोगाचे राज्यभरात अनुकरण 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राज्यातला पहिला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमधेही या प्रयोगाचे अनुकरण होत आहे.
kolhapur
kolhapur

कोल्हापूर/नगर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राज्यातला पहिला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमधेही या प्रयोगाचे अनुकरण होत आहे. नगर जिल्ह्यातील खडकी बुद्रुक (ता. अकोले) या गावात यंदा २३ आदिवासी शेतकऱ्यांच्या माध्यमातून साडेआठ एकरांहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी नाचणी लागवडीची प्रात्यक्षिके प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहेत.  दोन वर्षांपूर्वी पन्हाळा (जि. कोल्हापूर) तालुक्यातील किसरुळ, बाजारभोगाव, काळजवडे, पिसात्री, हरपवडे, तांदूळवाडी या गावांमधील अठरा शेतकऱ्यांनी पंधरा एकर क्षेत्रावर उन्हाळी नाचणी उत्पादनाचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला होता. उन्हाळ्यात नाचणीचे उत्पादन कित्येक पटीने जास्त मिळते हे या प्रयोगांमुळे सिद्ध झाल्याने गेल्या दोन वर्षांत उन्हाळी नाचणी लागवडीकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळत असल्याचे दिसून येते आहे.  या प्रयोगातून प्रेरणा घेऊन खडकी बुद्रुक येथे हा प्रयोग राबविण्यात येत आहे. नगरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बाळनाथ सोनावणे, कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे, कृषी सहायक शरद लोहकरे यांनी शेतकऱ्यांना तयार केले. क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गटाने उत्साह दाखवल्याने उन्हाळी नाचणीचा प्रयोग राबवणे शक्य झाल्याचे तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी सांगितले. नुकतीच उन्हाळी नाचणी प्रकल्पाला आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि या नवीन प्रयोगाचे कौतुक केले. या प्रयोगासाठी विभागीय कृषी संशोधन प्रकल्प कोल्हापूर येथील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, गगनबावड्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट, मिलेट असोसिएशन कोल्हापूर यांचे मार्गदर्शन होत आहे. 

प्रतिक्रिया  उन्हाळी नाचणीचा प्रयोग फायदेशीर ठरत असल्याचे लक्षात आले आहे. या पुढील काळात नाचणी उत्पादन ते प्रक्रिया अशी साखळी निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.  - बाळनाथ सोनावणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, अकोले, जि. नगर 

धान्य आणि चारा निर्मितीसाठी उन्हाळी नाचणी एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. मिलेट असोसिएशनच्या माध्यमातून व्यापक दृष्टिकोनातून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिलेट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील पौष्टिक लघू तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  - कृषिभूषण सर्जेराव पाटील, अध्यक्ष, मिलेट असोसिएशन कोल्हापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com