सोयाबीनच्या फुले संगम वाणाचे  विक्रमी प्रति हेक्टरी ३५.७२ क्विंटल उत्पादन 

ताकतोडा (ता. सेनगाव) येथील प्रगतीशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांना गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करून सोयाबीनच्या फुले संगम (केडिएस- ७२६) या वाणाचे विक्रमी म्हणजेच प्रति हेक्टरी ३५.७२ क्विंटल (एकरी १४.२८ क्विंटल) उत्पादन मिळविले आहे.
Soybean flowers of Sangam variety Record yield of 35.72 quintals per hectare
Soybean flowers of Sangam variety Record yield of 35.72 quintals per hectare
Published on
Updated on

हिंगोली ः यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा (ता. सेनगाव) येथील प्रगतीशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांना गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड करून सोयाबीनच्या फुले संगम (केडिएस- ७२६) या वाणाचे विक्रमी म्हणजेच प्रति हेक्टरी ३५.७२ क्विंटल (एकरी १४.२८ क्विंटल) उत्पादन मिळविले आहे.  तोंडापूर (ता. कळमनुरी ) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि बायफ संस्था यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गंत समूह पंक्ती पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम (सीएफएलडी ः तेलबिया) मध्ये ताकतोडा (ता. सेनगाव) या गावाची निवड करण्यात आली. ताकतोडा या गावाची सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी १४ क्विंटल होती. उत्पादकता वाढीसाठी या गावातील २५ शेतकऱ्यांची निवड करून कृषी विज्ञान केंद्रामार्फत निवड करण्यात आी. त्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनच्या नवीन वाण के.डी.एस.७२६चे (फुले संगम) प्रत्येकी ३० किलो बियाणे प्रात्यक्षिकाकरीता देण्यात आले. कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाचा अवलंब करून राहूल दत्तराव कव्हर यांनी यंदाच्या एप्रिल महिन्यात खोल नांगरणी केली. वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत केली. सोयाबीन बियाण्यास शिफारशीनुसार ट्रायकोडर्मा,रायझोबीयम, पीएसबीची बिजप्रक्रिया केली. माती परिक्षणावर आधारित शिफारशीनुसार असे खताच्या मात्रा दिल्या. गादी वाफ्यावर (बेडवर) टोकण पद्धतीचा अवलंब केला. याकरीता त्यांनी प्रत्येक बेडचा टॉप हा ६० सेंमी. ठेवला. त्यावर ६० बाय १५ सेंमी अंतरावर झिग झॅग पद्धतीने १६ जून रोजी सोयाबीन बियाण्याची टोकण पद्धतीने लागवड केली. याकरीता त्यांना २८ गुंठे १४ किलो बियाणे लागले. एकरी झाडांची संख्या ८१ हजार ६६६ ठेवली. तण नियंत्रण मशागतीय पद्धतीने करुन सुरुवातीपासूनच रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण केले. त्याकरीता निंबोळी अर्क तसेच शिफारशीत कीटकनाशकांचा वापर केंद्राच्या मार्गदर्शनात त्यांनी केला. कव्हर यांना २८ गुंठे क्षेत्रावर १० क्विंटल म्हणजेच ४० गुंठे (एक एकर) क्षेत्रावर १४.२८ क्विंटल उत्पादन मिळाले. या उत्पादनामधून त्यांनी साडेचार क्विंटल बियाणाची ९ हजार रुपये दराने विक्री केली.  समुह पंक्ती प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा उत्साहवर्धक उत्पादन घेतले. जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता ९.८६ क्विंटल असताना सरासरी २५. २० क्विंटल अधिक उत्पादकता मिळाली. उत्पादन खर्चात २५ टक्के बचत करून एकूण ३८.७८ टक्के जास्त उत्पादन घेण्यात आले.कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक कृषी तंत्रज्ञान ताकतोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर पोचवले जात आहे. विविध प्रशिक्षण, शेती दिनाचे आयोजन करण्यात आले. सरपंच प्रमोद सावके, शांतीराम सावके, बायफचे सोपान थिगळे, संतोष तलाल यांचे सहकार्य मिळाले. 

प्रतिक्रिया 

या पूर्वी सोयाबीनचा एकरी ६ ते ७ क्विंटल उतारा मिळत असे. यंदा फुले संगम वाणाची गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे अधिक  उत्पादन मिळाले.  -राहुल कव्हर, शेतकरी, ताकतोडा, ता. सेनगाव 

गादी वाफा पद्धतीने लागवड केल्यामुळे अतिरिक्त पाणी निचरा होतो. कमी पाण्यात तग धरून राहते. बुरशीजन्य रोगाचा प्राद्रुर्भाव कमी होतो. हवा व सूर्यप्रकाश खेळता राहिला. परिणामी उत्पादकता वाढली.  -राजेश भालेराव, कृषीविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,  तोंडापूर, जि. हिंगोली.  राजेश भालेराव ः ७५८८१५३३११  राहुल कव्हर ः ७२१८२४७८४२   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com