बहिणीने भावाला बांधली अनोखी ‘बीजराखी’
अकोले, जि. नगर : ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया,’ भाऊ आणि बहीण यांच्यातील पवित्र नात्याचा सण असलेला रक्षाबंधन देवगाव येथील बहिणीने अनोख्या पद्धतीने साजरा केला. राखीच्या माध्यमातून बीजबंधन बांधून आपल्या लाडक्या भाऊरायाला तीने ओवाळले आणि बीज महत्त्व विषद केले... रक्षाबंधनसणानिमित्त बहीण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी व राखी बांधण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. भावा-बहिणीचे प्रेम आणि ऋणानुबंध घट्ट करणारा हा सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून आदिवासी भागातील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे जन्मगाव असलेले देवगाव येथील देवराम भांगरे व ममताबाई भांगरे यांची कन्या आरती हिने आपला भाऊ प्रसाद याच्यासाठी जगावेगळी राखी बनवली आणि रक्षाबंधन सण साजरा केला. याकरिता अंगणात भव्य अशी बियाण्यांपासून तयार केलेली रांगोळी साकारली आहे. विविध रंगछटा आणि आकारातील बियांचा अतिशय कुशलतेने वापर करून ही रांगोळी साकारण्यात आली. विशेष म्हणजे हातामध्ये बांधण्यासाठी तयार करण्यात आलेली राखी ही सुद्धा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून व पारंपरिक बियाण्यांचा वापर करून बनवण्यात आली होती. ही कला आरती हिला तिच्या आईकडून म्हणजेच जगप्रसिद्ध अन्नमाता श्रीमती ममताबाई देवराम भांगरे यांच्याकडून मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत जागून बीज रांगोळी आपल्या घरासमोर आरती हिने साकारली. आपल्या भावाला आगळीवेगळी भेट देण्यासाठी तिने कठोर परिश्रम घेत एक वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला आहे. आपल्या वाडवडिलांकडून आदर्श घेत पुढचीही पिढी पारंपरिक बियाणे व शेती यांच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे हे उदाहरण आहे. परिसरातील महिला आणि ग्रामस्थ ही रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.