नाशिक : ‘‘राज्यातील शेळ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त जात आहे. किफायतशीर शेळीपालन करताना अर्धबंदिस्त शेळीपालन करावे’’, असे प्रतिपादन अखिल भारतीय समन्वीय संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले यांनी केले.
के. के. वाघ कृषी महाविद्यालय येथे ''किफायतशीर शेळीपालन'' या विषयावर ऑनलाइन शेतकरी मेळाव्याचे आयोजन झूम या ऑनलाइन व्यासपीठाद्वारे करण्यात आले.
डॉ. मंडकमाले म्हणाले, ‘‘किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास आणि पैदाशीमध्ये तो कळपातील पैदाशीच्या नराचा मोलाचा वाटा असतो. म्हणूनच ५० माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते. पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा. म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.’’
‘‘आहार व्यवस्थापन करताना शेळीला ६ ते ८ तास चारणे गरजेचे आहे. तसेच चाऱ्याचा तुटवडा असल्यास १ किलो हिरवा, ५०० ग्रॅम वाळलेला चारा रात्री द्यावा. याबरोबरच दररोज ३५० ग्रॅम पशुखाद्य द्यावे. पैदास हंगामात ५०० ग्रॅमपर्यंत खाद्य वाढवावे,’’ असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंचालन प्रा. नेहल भोकनळ यांनी केले. परिचय प्रा.ज्योती मोटे यांनी करून दिला. प्रा. स्वाती सोनावणे यांनी आभार मानले.
‘गोठ्यासाठी जास्त खर्च नको’
‘‘गोठा उभारणीबाबत शेळीच्या गोठ्यासाठी जास्त खर्च करू नये. जमिनीसाठी मुरमाचा वापर करावा. शेळीच्या उत्तम आरोग्यासाठी गोठ्यात गव्हाण असली पाहिजे. बंदिस्त शेळीपालन करताना आहारातील खर्च कपातीसाठी शेतातील दुय्यम घटक (सोयाबीन, हरभरा, तूर, गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा ) यांचा वापर करावा. अडचणीच्या वेळी मुरघासाचा वापर करावा, हिरव्या चाऱ्याची गरज झाडपाल्यावर भागवावी, बांधावर शेवगा, आंबा, हादगा लावावा’’, असा सल्ला डॉ. मंडकमाले यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.