धुळे : जिल्ह्यातील न्याहळोद व परिसरातील मुळ्याला मागील पंधरवड्याच्या तुलनेत सध्या किलोमागे चार रुपये अधिक दर आहे. इंदूरसह सुरत येथील बाजारातून मुळ्याला मागणी असून, शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल, असे चित्र आहे.
मागील महिन्यात मुळ्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने मुळा पशुधनाला चारा म्हणून देण्याची वेळ आली. तर काही शेतकऱ्यांनी मुळा बाजारात नेण्याऐवजी फेकून दिला. १७ फेब्रुवारीपासून दरवाढ सुरू झाली. सध्या आठ रुपये प्रतिकिलो असा दर मुळ्याला मिळत आहे. अल्प का असेना, काहीशी दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसू लागले आहे.
जिल्ह्यात धुळे तालुका मुळा उत्पादनात आघाडीवर आहे. कापडणे, देवभाने, सरवड, न्याहळोद, कौठळ, धमाणे, नगाव, नंदाणे, सायने, सोनगीर, मुकटी, जापी, शिरडाणे भागात मुळ्याचे मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाळा कमी असतानाही शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन यंत्रणेच्या आधारे मुळ्याची लागवड केली होती.
मुळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यंदा होत आहे. या भागातील शेतकरी मिळून सुरत व इंदूरच्या बाजारात मुळा पाठवित आहेत. वाहतूक भाडे व इतर खर्च वजा करता मुळ्याला दर बऱ्यापैकी मिळत असल्याचे शेतकरी दिनेश बडगुजर (कापडणे, ता. धुळे) म्हणाले.
मुळ्यासह शेवगा शेंगांनाही मागणी आहे. प्रतिक्विंटल ५००० रुपयांपर्यंत दर सुरतच्या बाजारात आहे. काही शेतकरी आठवड्यातून एकदा शेवगा सुरतला नेत असून, पुढे बॉक्समध्ये पॅकिंग करून शेवग्याची पाठवणूक करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.