सांगा, पॉलिहाउसमधील गुलाबाचं करायचं काय?

‘व्हॅलेंटाईन डे’ बाजार मोठ्या कष्टाने साधला. पुढे लग्नसराई, गणेशोत्सव अशा अनेक महत्त्वाच्या दिवसांमध्ये दोन पैसे होतील या आशेने पॉलिहाउसधारक गुलाब उत्पादकांनी हंगामाचे नियोजन केले.
rose damage
rose damage

नाशिक: ‘व्हॅलेंटाईन डे’ बाजार मोठ्या कष्टाने साधला. पुढे लग्नसराई, गणेशोत्सव अशा अनेक महत्त्वाच्या दिवसांमध्ये दोन पैसे होतील या आशेने पॉलिहाउसधारक गुलाब उत्पादकांनी हंगामाचे नियोजन केले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाली. गेली सहा महिने मागणी-पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कोट्यवधींचा फटका बसला. त्यामुळे आता पॉलिहाउसमधील गुलाबाचं करायचं तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

जिल्ह्यात जानोरी, मोहाडी, महिरावणी, मखमलाबाद, पंचवटी परिसर, शिलापूर, ओझर, आडगाव आदी परिसरात पॉलिहाउसमधील गुलाब लागवडीचा प्रयोग २५० हुन अधिक एकर क्षेत्रावर झाला आहे. येथे शेतकरी गुणवत्तापूर्ण उत्पादनही घेत आहेत.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाल्याने गुलाबाला मागणीच नव्हती. पुढे हळूहळू जनजीवन सुरळीत होऊन काही तरी साधले जाईल अशी अपेक्षा असताना संकट मात्र कायम आहे. त्यामुळे लागवडी शाबूत ठेवण्यासाठी फुले खुडून फेकून देण्याची वेळ आल्याने गुलाब उत्पादक हवालदिल झाले आहेत. एप्रिल ते जुलै महिना मुख्य लग्न समारंभाचा काळ असल्याने बाजारात तेजी असते. मात्र या दरम्यान बाजारच न फुलल्याने गुलाबाची लालीच गेली. एका महिन्यात प्रतिएकरी सरासरी ५० हजार नग गुलाब उत्पादन अपेक्षित आहे. मात्र टाळेबंदीपासून तर आत्तापर्यंत पीक व्यवस्थापन खर्च खिशातून पैसे घालून करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ज्यामध्ये मजुरी, फवारण्या, खते असा दर महिन्याला प्रती एकरी ३५ हजारांपासून तर ७५ हजारांपर्यंत खर्च करण्याची वेळ ओढवली आहे.  कर्जाचे हप्ते फेडणे मुश्‍कील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थाने बंद, लग्नसोहळे व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी, मुख्य शहरांमध्ये बाजारपेठा बंद असल्याने माल खुडून फेकून द्यावा लागत आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळ, यासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पॉलिहाऊसचे कागद फाटले. पावसामुळे डाऊनी, भुरी व इतर बुरशीजन्य रोगांसह कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात भांडवल संपल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पुढेही चित्र स्पष्ट नसल्याने कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांना बसलेला फटका 

 • पॉलिहाउसमधील लागवडी :  २५० एकर
 • एकरी नुकसान :  १५ लाख रुपये
 • मातीमोल झालेली फुले :  ७.५ कोटी नग
 • सरासरी दर :  ४.५ रुपये
 • प्रतिक्रिया टाळेबंदीमध्ये नवा रुपयाही अनेक जणांचा घडलेला नाही. मात्र उसनवारी करून आहे ते मोडून लागवडी जगविण्याची वेळ आली. त्यात रोगांचा प्रादुर्भाव वाढता असल्याने धीर सुटला. बँकेचे कर्जाचे हप्ते आता फेडू शकत नाही. सरकारने याकडे लक्ष घेऊन धीर द्यावा. - विश्वनाथ विधाते, गुलाब उत्पादक, जानोरी. ता. दिंडोरी

  खर्च करूनही उत्पन्न तोट्यात आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीवर उभे केलेला पॉलिहाउसचा प्रयोग कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. या पिकामुळे रोजगारनिर्मिती होऊन बाजारपेठ खुलते. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. - संजीव रासने, गुलाब उत्पादक, महिरावणी, ता. नाशिक

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com