विषबाधेमुळे साठवण तलावात हजारो मासे मृत

इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव हद्दीतील लघुपाटबंधारे विभागाच्या योजनेअंतर्गत असलेल्या तलावात तीन दिवसांत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
Poisoning kills thousands of fish in storage ponds
Poisoning kills thousands of fish in storage ponds

सर्वतीर्थ टाकेद, जि. नाशिक : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव हद्दीतील लघुपाटबंधारे विभागाच्या योजनेअंतर्गत असलेल्या तलावात तीन दिवसांत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. सर्वत्र तलाव परिसरात तलावाच्या पाण्याच्या कडेला रोहू, कटला, कोंबडा, तीलापिया या माशांच्या प्रजातींचे हजारो मासे मृतावस्थेत पडून मोठी दुर्गंधी पसरली आहे. या तलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा येथील नागरिकांचा आरोप आहे.

स्थानिक केशव विठ्ठल पडवळे यांना मत्स्य व्यवसायासाठी तलाव पाच वर्षे करारनामा करून दिला आहे. तलावात व तलावाच्या कडेला पाचशे ग्रॅमपासून ते दोन-तीन किलोचे हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस मासे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तलावाच्या कडेला मृत माशांचे ढीग तयार झाले आहेत. सर्पदेखील मृत्युमुखी पडल्याने तलावात विषबाधा झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी कोणीही पिण्यासाठी वापरू नये व कोणत्याही कामासाठी वापर करू नये, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

मासे मृत झाल्याने मत्स्यपालक पडवळे यांच्यासह भागीदारांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले. त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केशव पडवळे, गोरख पगारे, जालिंदर पडवळे, बाळकृष्ण भागडे यांनी केली आहे. शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पोलिस पाटील अंकुश वाजे, सरपंच लहानूबाई कचरे, गोविंद धादवड, खंडेराव जाधव, भास्कर वाजे यांनी केली आहे.

पाच वर्षांसाठी लिलाव पद्धतीने करारनामा करून खेड ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतला होता. चार भागीदार मिळून आतापर्यंत कर्जबाजारी होऊन १४-१५ लाख रुपये खर्च केला. विषबाधेमुळे तलावातील सर्व मासे मृत्युमुखी पडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. - केशव पडवळे, नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिक

गैरप्रकाराची प्रशासनाने चौकशी करून अज्ञातांविरोधात योग्य ती कठोर कारवाई करावी. नुकसानग्रस्तांची भरपाई देण्यात यावी. ग्रामस्थांनी आरोग्याच्या दृष्टीने सदर दुर्गंधी पाण्याचा वापर करू नये. - जगण वाजे, ग्रामस्थ खेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com