दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपात

कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन कायम असून दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे.
Milk price cut again by Rs 2
Milk price cut again by Rs 2

नगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन कायम असून दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी कपात केली आहे.

कमीशन व वाहतुकीसह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपये पडणार आहेत. त्यामुळे दर दिवसाला बसणाऱ्या आर्थिक नुकसानीतही अडीच कोटी रुपयांनी भर पडली आहे. सध्या राज्यात दर दिवसाला तेरा कोटींपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे वरचेवर दूध व्यवसाय अडचणीत येत आहे.

लॉकडाउन होणार असल्याचे दिसताच खासगी दूध संघचालकांनी मागणी घटल्याचे सांगत दुधाच्या दरात १ एप्रिलपासून सुरुवातीला तीन ते चार रुपयांनी कपात केली. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने कपात करत दीड महिन्यात आता प्रति लिटरमागे तब्बल दहा ते अकरा रुपयांनी कपात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमिशन व वाहतुकीसह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपये पडत आहेत. दोन रुपयांनी दरात कपात केल्याने आर्थिक नुकसानीत अडीच कोटीने वाढ झाली आहे. आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज १३ कोटींपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागत आहेत. राज्यात गायीचे १ कोटी ३० लाख लिटरच्या जवळपास संकलन होते. या आकड्यात सातत्याने कमी-जास्त होते. त्यातील ६० ते ६५ लाख लिटर दूध थेट ग्राहकांना पिशव्यांमधून विकले जाते तर साधारण पंधरा ते वीस लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरित दुधाची भुकटी होते.

दूध भेसळीकडे दुर्लक्ष ः जयाजी सूर्यवंशी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी म्हणाले, ‘‘राज्यात दूधप्रश्‍नासोबत दुधात होणाऱ्या भेसळीकडेही सरकारचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. सध्या दुधाची मागणी कमी झाल्याने दराचे प्रश्‍न निर्माण केला जात आहे. मात्र दुधातील होणारी भेसळही शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. दुधातील भेसळ कमी झाली तरी बऱ्यापैकी दूधदराचा प्रश्‍न कमी होईल. मात्र सरकारी आणि खासगी दूध संघाचे मालक मागील सरकारमध्ये होते, याही सरकारमध्ये आहेत. २०१७ च्या शेतकरी संपात दुधाला ४० रुपये हमी भाव मागितला, पण त्यावर एकमत झाले नाही. दूध संघापुढे जाणकार हताश झाले होते. त्या वेळेस २७ रुपये दर देण्याचा एकमुखी निर्णय झाला, परंतु नंतर सुकाणू समिती आली तो निर्णय गुंडाळला.

शेतकरी नेते गप्प राज्यात दूधदराचा प्रश्‍न अधिक किचकट होत आहे. गेल्या दीड महिन्याचा विचार केला तर गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे तब्बल दहा रुपयांनी कपात झाली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने राज्यभर दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाचे व उपपदार्थांचे दर कायम असताना शेतकऱ्यांकडून खेरदी केलेल्या दुधाचे दर मात्र मागणी नसल्याचे कारण पुढे करून संघानी कमी केले. गेल्या वर्षी तरी अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. यंदा मात्र तो तसा कोणताही प्रयत्न झाला नाही. दूध संघचालक मात्र वाटेल तसे सोयीने दर कमी करत आहेत. नेहमी दुधाच्या प्रश्‍नावर आवाज उठवणारे राज्यभरातील नेते गप्प आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com