
नांदेड : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, हीच आमची मागणी आहे, आम्हाला केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात पडायचे नाही, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड येथे शुक्रवारी (ता. २०) आयोजित मराठा क्रांती मूक आंदोलनादरम्यान संभाजीराजे बोलत होते. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतून हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली. पण त्यासाठी काहीही पाठपुरावा केला नाही. मराठा समाज, मराठा नेते बोलले आता सरकारने बोलावे. मला संसदेत बोलू दिले नसते तर खासदारकी सोडली असती, असे संभाजीराजे म्हणाले.
‘‘ज्या वेळी तुमचं आरक्षण रद्द झालं, त्या वेळी तुम्हाला सामाजिक-आर्थिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल, हे स्पष्ट आहे. हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्याची आहे. १२७ व्या घटना दुरुस्तीमध्ये केंद्राने राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार दिले. पण इंद्र साहनी खटल्यानुसार ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे ५० टक्क्यांची मर्यादा ही सर्वप्रथम वाढवली पाहिजे, ही मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे,’’ असेही संभाजीराजे म्हणाले.
या मूक आंदोलनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्याचे आयोजन होते. परंतु आंदोलनातील गर्दीमुळे ऐनवेळी यात बदल करण्यात आले. प्रारंभी माधव देवसरकर यांनी जिल्ह्याच्या वतीने, तर राज्याच्या वतीने राजेंद्र कोंढरे यांनी भूमिका मांडली. या वेळी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.
अशोक चव्हाण यांच्यावर टीका नांदेडचे सुपुत्र दिल्लीत येऊन सर्वांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांनी ही जबाबदारी घ्यायला हवी. पण ते कुठे दिसत नाहीत, असे म्हणत संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.