टोमॅटोवरील ‘सीएमव्ही’ रोग नियंत्रणासाठी पथदर्शक प्रकल्प

टोमॅटो पट्ट्यावरील ‘सीएमव्ही’ (कुकुंबर मोझॅक व्हायरस) व अन्य विषाणूजन्य रोगांचे निवारण करण्यासाठी बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) महत्त्वाची पावले उचलली आहेत.
टोमॅटोवरील ‘सीएमव्ही’ रोग नियंत्रणासाठी पथदर्शक प्रकल्प
टोमॅटोवरील ‘सीएमव्ही’ रोग नियंत्रणासाठी पथदर्शक प्रकल्प
Published on
Updated on

पुणे : टोमॅटो पट्ट्यावरील ‘सीएमव्ही’ (कुकुंबर मोझॅक व्हायरस) व अन्य विषाणूजन्य रोगांचे निवारण करण्यासाठी बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून नारायणगाव, संगमनेर व नाशिक अशा तीन ठिकाणी ‘एकात्मिक कीड-रोगनियंत्रण’ चाचण्या पथदर्शक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 

मागील वर्षी उन्हाळ्यात राज्यातील महत्त्वाच्या टोमॅटो पट्ट्यात ‘सीएमव्ही’ (कुकुंबर मोझॅक व्हायरस) व अन्य विषाणूजन्य रोगांमुळे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. ‘आयआयएचआर’चे विषाणूशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. कृष्णा रेड्डी प्रत्यक्ष शेतांना भेटी, रोग सर्वेक्षण व पुढील रणनीती यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मागील वर्षी संगमनेर, अकोले, सातारा, नारायणगाव आदी राज्यांतील महत्त्वाच्या टोमॅटो पट्ट्यात अज्ञात विषाणूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव होऊन फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या वेळी प्राप्तस्थितीत काही शेतकरी, कृषी विभाग व बियाणे कंपन्यांमार्फत रोगग्रस्त झाडाचे नमुने (पाने, फळे) बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेकडे (आयआयएचआर) पाठवण्यात आले. शास्त्रीय परीक्षणानंतर नमुन्यांमध्ये मावा किडीमार्फत पसरणाऱ्या कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोग सर्वाधिक म्हणजे ८० टक्के प्रमाणात आढळला. तर ग्राउंटनट बड नेक्रॉसिस व्हायरस, टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस, टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस आदीही विषाणूजन्य रोग थोड्या प्रमाणात आढळले. 

शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी ‘लॉकडाउन’मुळे मागील वर्षी प्रादुर्भावग्रस्त शेतांना प्रत्यक्ष भेट देणे ‘आयआयएचआर’चे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. एम. कृष्णा रेड्डी यांना शक्य झाले नाही. सध्या मात्र टोमॅटोचा हंगाम सुरू असल्याने नारायणगाव, संगमनेर व नाशिक येथे प्रत्यक्ष सर्वेक्षण व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी डॉ. रेड्डी बंगळूरहून दाखल झाले आहेत. मंगळवार (ता. १६) रोजी त्यांनी नारायणगाव (जि. पुणे) येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतांना व दोन रोपवाटिकांना भेटी दिल्या. 

संगमनेर व नाशिक भागातही दौऱ्याचे नियोजन आहे. याबाबत बोलताना डॉ. रेड्डी म्हणाले, की महाराष्ट्रात ‘सीएमव्ही’ रोगाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांत जागृती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी आम्ही मागील सप्टेंबरमध्ये ‘ऑनलाइन वेबिनार’ ठेवला. त्या वेळी पूर्वी हा रोग एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता, आताच तो कसा आला? इथपासून ते हा रोग बियाण्यातून आल्याच्या विविध शंका काहींनी व्यक्त केल्या. आम्ही झाडांच्या नमुन्यांबरोबर विविध कंपन्यांकडील बियाण्यांचेही परीक्षण केले. त्यातून मावा किडीमुळेच रोगाचा मुख्य प्रसार होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला. 

नारायणगाव भागात प्रादुर्भाव  डॉ. रेड्डी म्हणाले, की आम्ही भेटी दिलेल्यांपैकी दोन शेतांमध्ये टोमॅटो काढणीच्या अवस्थेत आहे. तेथे काही प्रमाणात ‘सीएमव्ही’ दिसून आला. मात्र फळाची अवस्था सुरू झालेल्या तिसऱ्या शेतात मात्र या रोगाचा सर्वाधिक म्हणजे ९० टक्के प्रादुर्भाव दिसून आला. तेथे मावा किडीची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. पंधरा मिनीटे शेतातून फिरल्यास प्रत्येकाच्या सदऱ्यावर तीन चे चार मावा दिसून येत होते. रोग, मावा किडीची ओळख, लक्षणे, निदान याबाबत आम्ही अशा प्रकारे प्रत्यक्ष प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. 

चाचणी प्रकल्प राबवणार  डॉ. रेड्डी म्हणाले, की शेते व रोपवाटिकांना प्रत्यक्ष भेटी व सर्वेक्षण तसेच टोमॅटो उत्पादकांशी चर्चा मसलत करून रोगाचा उद्‍भव व प्रसारामागील नेमकी कारणे शोधण्यात येतील. हवामानाचा अभ्यास करण्यात येईल. त्यापुढील पायरी म्हणून नारायणगाव, संगमनेर व नाशिक अशी तीन प्रातिनिधिक ठिकाणे निश्‍चित करून तेथे ‘एकात्मीक कीड-रोगनियंत्रण’ चाचण्या प्रात्यक्षिक प्रकल्प राबवण्यात येईल. त्यामध्ये शेतकरी, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बियाणे उद्योगातील कंपन्या अशा सर्वांना सहभागी करून घेण्यात येईल. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर राज्यातील समस्त शेतकऱ्यांना त्या पथदर्शक म्हणून पाहण्यासाठी उपलब्ध असतील. एखादी चाचणी अयशस्वी झाल्यास त्याचीही कारणे शोधून त्यात सुधारणा करण्यात येईल. प्रकल्पांतर्गत रोपवाटिकेपासून शेतातील पुनर्लागवड ते काढणीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

डॉ. रेड्डी यांनी नोंदवलेली निरीक्षणे 

  • मावा हाच ‘सीएमव्ही’ रोगाचा मुख्य वाहक. त्याच्या तीन मुख्य प्रजाती कारणीभूत. 
  • थंडीच्या हवामानात माव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात. त्याची लक्षणे पिकावर उन्हाळ्यात दिसण्यास सुरुवात. 
  • प्रत्येक भागातील शेती व पीकपद्धती, हवामान आदी बाबी अभ्यासून त्या त्या भागासाठी आदर्श एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापनाची रणनीती ठरवणार. 
  • एका पिकानंतर दुसरे पीक त्वरित लावले जाते. मध्ये पुरेसा रिकामा कालावधी न मिळाल्याने रोगाची तीव्रता वाढते. 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com