नगर : लोकसहभागातून ग्रामविकासात आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मार्च अखेर शंभर टक्के कर्ज भरण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. ३०० सभासद असलेल्या हिवरेबाजारमध्ये कर्जदार २०० सभासदांनी एक कोटी ९० लाख रुपये पीककर्ज भरले आहे. बारा वर्षांपासून सेवा संस्थेचे शंभर टक्के कर्ज भरण्याची परंपरा जोपासणारे हिवरेबाजार हे एकमेव गाव आहे. ग्रामविकास आणि लोकसहभागातून राज्य, देशासह परदेशातही आदर्श निर्माण करणाऱ्या हिवरेबाजारमध्ये आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतरही अनेक आदर्शवत उपक्रम राबवले जातात. माथा ते पायथा उपक्रमातून पाणी उपलब्ध केल्याने गाव शिवारात शेतीलाही चांगला बहर आला आहे. जिल्हा बॅंकेच्या सेवा सहकारी सस्थेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. हिवरेबाजार सेवा संस्थेचे ३०० सभासद आहेत. दरवर्षी मार्च महिना जवळ आला, की शेतकऱ्यांची पीककर्ज भरण्याची लगबग सुरू असते. तीनशे पैकी यंदा २०० सभासद शेतकऱ्यांना संस्थेकडून यंदा (२०२०-२१) एक कोटी ९० लाख २८ हजार ५०९ रुपयांचे पीककर्ज दिले होते. दिलेले पीककर्ज मार्चअखेर शंभर टक्के भरण्याचा आदर्श गावाने १२ वर्षांपासून जोपासला आहे. तो आदर्श यंदाही कायम ठेवला. संस्थेने शेतकरी सभासदांना वितरित केलेल्या एक कोटी ९० लाख २८ हजार ५०९ रुपयांची बुधवार (३१ मार्च)अखेर पूर्णपणे वसुली झाली आहे. सभासद व बॅंकपातळीवर १०० टक्के वसुली करणारे हिवरेबाजार हे एकमेव गाव आहे. प्रत्येक सभासदाने कर्जाची रक्कम भरून खाते नियमित करून घेतले आहे. त्यासाठी सभासदांच्या सहकार्याबरोबरच उपाध्यक्ष विठ्ठल ठाणगे, एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, अर्जुन पवार, जालिंदर चत्तर, दामोदर ठाणगे, अशोक गोहड व संस्थेचे सचिव कुशाभाऊ ठाणगे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेतकरी वेळेत पीककर्ज भरण्याला प्राधान्य देत असल्याने संस्था नफ्यात असते, असे सचीव कुशाभाऊ ठाणगे यांनी सांगितले. नियमित कर्ज घेणे आणि नियमित भरणे आदर्श गाव हिवरेबाजारने बारा वर्षांपासून सेवा संस्थेकडून घेतलेले पीककर्ज वेळेत भरल्याने आतापर्यंत एकही शेतकरी थकबाकीदार नाही. नियमित पीककर्ज भरणाऱ्या सभासदाकडून सहा टक्के व्याज आकारले जाते. मात्र पीककर्ज थकले तर साडेआकरा टक्के व्याज द्यावे लागते याची गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना जाणीव आहे. त्यामुळे राज्य, देशासह परदेशातही आदर्श निर्माण करणाऱ्या हिवरेबाजारमध्ये आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नियमित पीककर्ज घेणे आणि वेळेत परतफेड करणे’ हा संकल्पही येथील शेतकरी बारा वर्षांपासून जोपासत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.