पुणे : मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यातील अनेक भागांत मॉन्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. खानदेश, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे खरिपातील पिकांना मोठा आधार मिळाला आहे. कोकणातही पावसामुळे भारजा, जगबुडी, वासिष्ठी, काजळी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जालन्यातील नद्याही वाहत आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अति पावसामुळे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत आणि अनेक ठिकाणी शेती खरवडून गेली आहे.
कोकणात मुसळधार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. सलग तिसऱ्या दिवशी भातशेती पाण्याखालीच आहे. रत्नागिरीतील दापोली तालुक्यात पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे किनारी भागातील भात लावण्याची कामे खोळंबली आहेत. मंगळवारी (ता.१३) सायंकाळी जोर ओसरला होता; मात्र रात्रीपासून बुधवारी (ता. १४) दुपारपर्यंत ढगफुटीसारखा पाऊस सुरू होता.
मंगळवारी दुपारनंतर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील पूरस्थिती ओसरून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. पाऊस वाढल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड, दोडामार्ग या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील अनेक पुलांवरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. खारेपाटण परिसरातील पूर ओसरला आहे.
खानदेश, कोल्हापुरात जोरदार कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भाग वगळता अन्य भागांत तुरळक पाऊस झाला. पश्चिमेकडील धरणक्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून बंद केलेला बाराशे क्युसेकचा विसर्ग पुन्हा सुरू केला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी वाढली होती. याच बंधाऱ्यावरून १७ हजार ९९८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, भागात पावसाचा जोर काही कमी असल्याने अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. खानदेशात पावसाचा जोर अधिक होता. जळगाव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
मराठवाड्यात पावसाचा दणका गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंत मराठवाड्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडल्याने पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड व परभणी या पाच जिल्ह्यांतील ३३ मंडळांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी, नद्या ओढ्यांना पूर आला. काही ठिकाणी जमीन खरडून गेल्या आहेत. पिकांना मोठा फटका बसला. जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. नांदेड जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८१ मंडळांमध्ये बुधवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. हिंगोली, परभणीत अतिवृष्टी झाली. गळाटी, लेंडी या नद्यांच्या पुराचे पाणी काठावरच्या शेतात शिरले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली बुडाली. १२ गावांचा संपर्क तुटला आहे. परळी-गंगाखेड- लोहा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे दुधना, पूर्णा नद्यांना पूर आले आहेत.
वऱ्हाडात जोरदार पावसाची हजेरी वऱ्हाडात मागील तीन दिवसांपासून विविध भागांत पाऊस हजेरी देत आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस झाला. या पावसाने पिकांना मोठा दिलासा दिला. पेरण्यांसाठीही पोषक वातावरण तयार झाले आहे. गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस मागील दोन-तीन दिवसांत सक्रिय झाला आहे. पावसामुळे शेतीतील कामे बुधवारी बऱ्याच ठिकाणी ठप्प होती. प्रामुख्याने बुधवारी रात्री जोराचा पाऊस आला. या पावसामुळे जूनमधील पेरणी केलेल्या पिकांना मोठा फायदा झाला. बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. खामगाव, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी दिली. पूर्व विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी पडल्याने काहीसा दिलासा मिळाला.
येथे झाला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस : कुलाबा १११.२, म्हसळा १०६, पनवेल ११७.८, तळा १०१, उरण १४५, गुहागर १०२, लांजा ११५, राजापूर १८९, रत्नागिरी १६२.७, संगमेश्वर १४५, दोडामार्ग १५०, मालवण १४७, सावंतवाडी १३०, वेंगुर्ला १३१.६, गगणबावडा १३५, बिलोली ११२, पालम १५२, परतूर १०५. राज्यात बुधवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्त्रोत - हवामान विभाग कोकण : सांताक्रुझ ८९.६, डहाणू ५८.१, पालघर ४९, तलासरी ३८, वसई ६८, अलिबाग ७०, कर्जत ३२.६, खालापूर ३९, महाड ६६, माणगाव ६६, माथेरान ५६, मुरूड ७७, पेण ६९, पोलादपूर ६५, रोहा ७२, श्रीवर्धन ८०, सुधागडपाली ५५, चिपळूण ८७, दापोली ९८, हर्णे ९६.४, खेड ९४, मंडणगड ८५, देवगड ६५, कणकवली ७१, कुडाळ ९०, मुलदे (कृषी) ८९.२, रामेश्वर ७२.२, वैभववाडी ८४, भिवंडी ३२, कल्याण ३४, ठाणे ८१, उल्हासनगर ४७
मध्य महाराष्ट्र : धुळे ४१, भाडगाव ५५, चाळीसगाव ४४, दहीगाव ६२, धरणगाव ६१, एरंडोल ५६, जळगाव ३६.३, पारोळा ९७, चंदगड ४२, राधानगरी ४४, महाबळेश्वर ६७.२ मराठवाडा : सिल्लोड ६३, अंबाजोगाई ५५, परळी वैजनाथ ४१, आंबड ९०, बदनापूर ७५, घनसांगवी ८५, चाकूर ५६, जळकोट ४०, देगलूर ५४.२, कंधार ५५, लोहा ३२, मुखेड ३०, नांदेड ३९, गंगाखेड ७८.५, मानवत ६४, परभणी ६८, पाथरी ७२, पूर्णा ३४, सेलू ३८, सोनपेठ ९२
विदर्भ : अकोला ३२.६, पातूर ३०.५, लाखणी ४८.३, साकोली ३१, बल्लारपूर ६७, जेवती ४२.६, नागभिड ४२.७, सावळी ३२.२, सिंदेवाही ४२.२, भामरागड ५६.७, देसाईगंजवडसा ३४, गडचिरोली ३१.३, मुलचेरा ३२.२, सिरोंचा ६२.८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.