‘ई-पीक पाहणी’तून हमीभाव खरेदीची नोंदणी

राज्यात भ्रमणध्वनीद्वारे ‘ई-पीक पाहणी’ करण्यात येत आहे. त्यात आता हमीभाव धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याची एकत्रित सुविधा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
Guaranteed Purchase Registration from ‘E-Crop Survey’
Guaranteed Purchase Registration from ‘E-Crop Survey’

पुणे ः राज्यात भ्रमणध्वनीद्वारे ‘ई-पीक पाहणी’ करण्यात येत आहे. त्यात आता हमीभाव धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याची एकत्रित सुविधा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना सध्या ई-पीक पाहणीसाठी वेगळे उपयोजन (अॅप्लिकेशन) वापरावे लागते. तसेच हमीभावाने धान्य विक्रीसाठी नोंदणी करताना पुन्हा वेगळी प्रणाली वापरावी लागते. ई-पीक पाहणी करतानाच उभ्या पिकाचे छायाचित्र तसेच नोंदणी करण्याची सुविधा दिल्यास शेतकऱ्यांच्या दोन अडचणी दूर होऊ शकतील. 

पहिली अडचण म्हणजे ई-पीक पाहणी झाल्यानंतर उभ्या पिकाचे नुकसान झाल्यास शासनाला पुन्हा पंचनामा करावा लागतो. तसेच विम्यासाठी शेतकऱ्याला आधी नुकसान झाल्याबाबत पूर्वसूचनाही द्यावी लागते. त्यासाठी सध्या भ्रमणध्वनीमध्ये एकत्रित सुविधा नाही. त्यामुळे नुकसान होताच पिकाचे छायाचित्र पुरविण्याची (अपलोडिंग) सुविधा ई-पीक पाहणीच्या अॅपमध्येच दिली जाणार आहे. दुसरी अडचण हमीभावाने शेतीमालाची विक्री करायची असल्यास सध्याच्या ई-पीक पाहणीचीच माहिती महसूल विभाग वापरतो. 

मात्र तेथे नोंदणीची सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. यापुढे हरभऱ्याची ई-पीक पाहणी करून माहिती नोंदवत असतानाच शेजारी ‘नोंदणी’ नावाचे बटण असेल. ते बटन दाबल्यानंतर आपोआप नोंदणी होईल. त्यामुळे हरभरा काढताच हमीभाव विक्री केंद्रावर विकण्यासाठी पुन्हा इतरत्र नोंदणीची गरज शेतकऱ्याला भासणार नाही. ई-पीक पाहणीमध्ये विविध सुविधा आणण्यासाठी सध्या या प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे व त्यांचा चमू विविध प्रकारच्या चाचण्या घेतो आहे.  “आम्ही ई-पीक पाहणीच्या अॅपमध्येच पिकांच्या स्थळाची नोंद अचूक होण्यासाठी अक्षांश-रेखांश आधारित छायाचित्र अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे शेत एका बाजूला व पिकाचे छायाचित्र भलत्याच ठिकाणचे अपलोड होण्याचे सध्या होत असलेले प्रकार थांबतील,” अशी माहिती तांबे यांनी दिली. 

यापुढे मुदतवाढ नाही “राज्यात भ्रमणध्वनीवरून ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे. आता ३१ मार्चपर्यंत पीकपाहणी नोंदविता येईल. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण बहुतेक भागात पिकांची कापणी सुरू झालेली असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करावी. तसेच कोणतीही अडचण असल्यास तलाठ्याशी संपर्क साधावा. पीक पाहणीची अंतिम जबाबदारी तलाठ्याचीच आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com