पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल

रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने व किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी पुसद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीची खताची पिके घेतली आहेत.
पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल Farmers in Pusad taluka Tend to green manure
पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचा हिरवळीचे खत करण्याकडे कल Farmers in Pusad taluka Tend to green manure
Published on
Updated on

श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने व किमती वाढल्याने जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी पुसद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हिरवळीची खताची पिके घेतली आहेत. ही पिके शेतीला उपयुक्त ठरू लागली आहेत. ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जमिनीला सेंद्रिय खतांची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते हा उत्तम पर्याय असल्याने याची लागवड अनेक शेतात दिसून येत आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी घरोघरी असणाऱ्या बैलाच्या जोड्यांची जागा यंत्राने घेतली आहे. पशुधन कमी झाल्याने व दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. घरोघरी जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जमिनीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. शेणखत मिळाले तरी त्यासाठी मोजावी लागणारी किमत भरमसाट असण्याबरोबरच त्यामध्ये असणारा कचरा, कुटार, बाभूळ, बेहडा, सूबाभूळ यांच्या बिया, प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात रानात पसरण्याबरोबरच पुढच्या पिकात वाढणारे तण यामुळे आर्थिक खर्च वाढतो आहे. रासायनिक खतांचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन नापिक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यात येते. त्या वेळी शेताच्या केलेल्या नांगरटीच्या साह्याने हे पीक जमिनीत गाडून टाकले जाते व शेतीला सुपीक बनवते. पुसद तालुक्यातील वालतूर रेल्वे, गायमुखनगर व अनेक शेतकऱ्यांनी ताग व ढेंचा या हिरवळीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे. शेतात वारंवार पिके घेतल्याने सेंद्रिय कर्बाची व नत्राची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके उपयुक्त ठरू लागली आहेत.  

प्रतिक्रिया ढेंचापासून प्रति एकर ८० क्विंटल हिरवळीचे खत मिळते. जे एकरी २२४ क्विंटल शेणखता एवढा फायदा शेतकऱ्यास देते. हिरवळीचे खत कुजत असताना सूक्ष्म जिवाणूंच्या निर्मितीत चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. ढेंचापासून प्रति एकर ७५ किलो युरिया, ७.३ कि. स्फुरद,१७.८  कि. पोटॅश,१.९ कि. गंधक, १.४ कि. कॅलशिअम, १.६ कि. मॅग्नेशिअम ही अन्नद्रव्ये आणि जस्त २५ पी.पी.एम., लोह १०५ पी.पी.एम.मँगेनीज ३९ पी.पी.एम. व तांबे ७ पी.पी.एम.ही सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याबरोबरच पिकांच्या मुळांवर आक्रमण करणारे सूत्रकृमी व अति प्रकारच्या तणांचा नाश होतो. -आर. आर. पाटील,  बीज परीक्षण अधिकारी महाबीज, अकोला

प्रतिक्रिया कृषी विभागाने परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत बान्सी, वेणी व येहळा येथील सव्वीस शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला असून, येत्या खरीप हंगामात ढेंचाचे नियोजन केले असून, वेणी, बान्सी, येरंडा व येहळा येथील शेतकरी गटातील १२३ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन केले आहे.  -संतोष मोरे, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग पुसद़

प्रतिक्रिया मागील वर्षी मी चार एकर क्षेत्रावर उन्हाळी ढेंचा घेतला होता. खरिपात पेरलेल्या सोयाबीनला कुठलेही रासायनिक खत न टाकताही एकरी नऊ क्विंटलचा उतारा आला होता. जमीन मऊ होण्याबरोबरच तण कमी झाले. रासायनिक खताचा आर्थिक खर्च वाचून जमिनीचा पोत सुधारल्याने शेतकऱ्यांनी शेणखत उपलब्ध होत नसल्याने हिरवळीचे खत घ्यावे. -संभाजी टेटर पाटील,   प्रयोगाशील शेतकरी, वरुड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com