नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर क्षीरसागर यांनी ‘सुधाकर सीडलेस’ नावाचा द्राक्ष वाण विकसित केला आहे. त्यांच्या या वाणाला केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. सुधाकर क्षीरसागर हे अनेक वर्षांपासून द्राक्षाची पारंपरिक शेती करतात. त्यांच्याकडे पूर्वीपासून 'थॉमसन सिडलेस' या वाणाची लागवड होत होती. १९९४ मध्ये त्यांना स्वमुळ पद्धतीने (ओनरूट) लागवड केलेल्या थॉमसन जातीच्या द्राक्षबागेत एक वेगळ्या पद्धतीचे झाड आढळून आले. इतर झाडांच्या तुलनेत ही द्राक्षवेल सशक्त दिसून आल्याची बाब क्षीरसागर यांनी हेरली. त्यानंतर ५ ते ६ वर्षे निरीक्षण करीत असताना पारंपरिक थॉमसन सिडलेसपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये त्यात आढळून आली. फळांची गोडी, एकसारखेपणा, फळांची न होणारी कूज, द्राक्षमण्यांची तुलनेने कमी नैसर्गिक गळ, कमी संजीवकांच्या वापरात चांगली प्रतवारी, पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता आणि विशेष म्हणजे बुरशीनाशकाच्या कमी वापरामध्ये चांगले संरक्षण हे निर्यातीसाठी लागणारे सर्व गुण या जातीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. २००१ पूर्वी स्वमुळ पद्धतीने लागवड केली जात होती त्यानंतर वेगवेगळ्या द्राक्ष जातीचे कलम केले जाऊ लागले. त्या पद्धतीने ६० झाडांवर क्षीरसागर यांनी या वाणाचे कलम करून निरीक्षण केले. नंतर आलेले चांगले उत्पादन पाहून त्याच ६० झाडांच्या आधारे सुधाकर सिडलेसच्या लागवडीचे क्षेत्र वाढवले. सन २०१२ मध्ये या सुधाकर सिडलेस वाणाच्या काड्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे प्रायोगिक लागवडीसाठी दिल्या. त्याचे चांगले परिणाम दिसल्याने पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. रोशनी समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे रोपाचे वाण आणि शेतकरी हक्काचे संरक्षण अधिनियम नियम २००१ नुसार ‘सुधाकर सिडलेस’च्या अधिकार हक्कासाठी अर्ज केला. गेल्या तीन वर्षांत दीपल रॉय चौधरी, डॉ .जयंत खिलारी, डॉ. विक्रम पांडे, डॉ. एस. बी. गुरव यांनी ‘सुधाकर सिडलेस’ वाणाच्या द्राक्षबागेला भेट देऊन निरीक्षणे नोंदवली. त्यानुसार अहवाल दिल्ली येथील कार्यालयात सादर केला. त्या अहवालानुसार ‘सुधाकर सिडलेस’ ही द्राक्षाची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण जात विकसित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ‘सुधाकर सिडलेस’ या जातीच्या द्राक्षाचे अधिकृत अधिकार हक्क सुधाकर क्षीरसागर यांना देण्यात आले तसे प्रमाणपत्र नुकतेच त्यांना देण्यात आले आहे. सर्व हक्क क्षीरसागर यांना प्राप्त अधिकार हक्कानुसार श्री. क्षीरसागर यांच्या परवानगीशिवाय ‘सुधाकर सिडलेस’ या वाणाच्या रोपाची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण आयात, निर्यात कोणालाही परस्पर करता येणार नाही. कायद्याच्या आधारे दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे क्षीरसागर यांची परवानगी या वाणासाठी आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.