देशातून डाळिंबाची निर्यात यंदा रोडावली 

गेल्या वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या अभूतपूर्व संकाटाशी सामना करावा लागला. या पावसाने डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा फटका निर्यातीला बसला.
pomegranate
pomegranate
Published on
Updated on

सांगली ः गेल्या वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या अभूतपूर्व संकाटाशी सामना करावा लागला. या पावसाने डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा फटका निर्यातीला बसला. २०१९-२० मध्ये देशातून सुमारे ८१ हजार टन डाळिंबाची निर्यात झाली होती. परंतु यंदा अवघी ४० हजार टन डाळिंब निर्यात झाली. डाळिंबाच्या निर्यातीमधून सुमारे ६०० ते ७०० कोटींची उलाढाल होत असते. राज्यातून सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के डाळिंबाची निर्यात झाली असल्याचे डाळिंब उत्पादक संघाच्या सूत्रांनी सांगितले. 

देशात डाळिंबाचे क्षेत्र वाढत असताना अनेक शेतकरी निर्यातक्षम डाळिंब पिकवू लागला आहेत. प्रामुख्याने युरोपीय देशांसह अन्य देशांत डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येऊ लागले आहेत. युरोपला सुमारे ३ हजार टन डाळिंबाची निर्यात होते. युरोपला निर्यात केलेल्या डाळिंबाला चांगला दरही मिळतो. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून युरोपला डाळिंबाची निर्यात वाढली असल्याचे चित्र आहे. देशातून डाळिंबाची युरोपसह नेदरलॅंड, बांगलादेश, गल्फ आणि नेपाळ यासह अन्य देशांत निर्यात होते. देशातून होण्याऱ्या निर्यातीचा आलेख दरवर्षी वाढू लागला. गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात डाळिंबाला पोषक असे वातावरण होते. पहिल्या टप्प्यात डाळिंबाच्या बागा चांगल्या बहरल्या होत्या. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडत आहे.  यंदा डाळिंब बहरात असताना पावसाचे संकट ओढावले. त्यामुळे डाळिंब शेतात पाणी साचून राहिले. फुलगळ तेलकट रोग, फळकुज, फळगळ झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा बहर धरला. त्यावरही परतीच्या पावसाचे पाणी फिरले. प्रामुख्याने मृग बहरातील डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. या मृग हंगामातील डाळिंबावर नैसर्गिक आपत्तीने घाला घातला. त्यामुळे ८० ते ९० टक्के डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले. युरोपला गेल्या वर्षी देशातून ३ हजार टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा एक हजार टनांनी निर्यात कमी झाली आहे. राज्यातून सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के डाळिंबाची निर्यात झाली असून, देशातील इतर राज्यांतून १५ टक्के निर्यात झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली होती. यंदा डाळिंबास गतवर्षीपेक्षा चांगले दर मिळाले असले, तरी डाळिंब शेतीस घातलेला खर्चाचा ताळमेळ कसातरी बसला.  डाळिंबाचा दर (प्रति किलो)  २२५  युरोप  १५० ते २००  देशांतर्गत  डाळिंबाची झालेली निर्यात (टनांत)  युरोप ः २०००  बांगलादेश ः ३४०००  इतर ः ४०००  प्रतिक्रिया देशातून गेल्या वर्षी सुमारे ८१ हजार टन डाळिंबाची निर्यात झाली होती. मात्र पावसाने डाळिंबाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे यंदा डाळिंबाची निर्यात कमी झाली आहे. परिणामी, परकीय चलनदेखील कमी मिळाले आहे.  - प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com