सोमेश्वरनगर, जि. पुणे : ‘‘राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकासकामांना कात्री लावून मदत करत आहोत. अर्थसंकल्प सादर करताना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी जाहीर केली. सोमेश्वर कारखान्याचा गव्हाण पूजन व गाळप हंगाम प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवाकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘दोन लाखांच्या वरील कर्जदार आणि नियमित भरणा करणारे अजूनही लाभापासून वंचित आहेत. पण त्यामुळेच तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्ज देण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. गुंजवणीचे पाणी गराडे व नाझरे धरणातही सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंजवणीबाबत मी, सुप्रिया सुळे, संजय जगताप, संग्राम थोपटेंची बैठक झाली. गुंजवणी-भोर यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत आणि पुरंदरचीही जमीन ओलिताखाली आली पाहिजे म्हणून कसरत करावी लागत आहे. सोमेश्वरचा जादा ऊस आपल्याच भावात अन्य कारखान्यांनी न्यावा यासाठी प्रयत्नशील आहे.’’ शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे म्हणाले, ‘‘माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे माझा मुलगा जरी संचालक मंडळात असला तरी कामकाजात काही चुकीचे वाटल्यावर मी अजितदादांकडे दाद मागणार. शेतकरी कृती समिती कायम त्यांच्यासोबत राहील. मात्र एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना हवी आहे.’’
‘भाजप’मधील आरोप करणाऱ्यांना आव्हान बंद कारखाने चालवायला घेण्यावरून भाजपमधून पवारांना टार्गेट केले जात आहे. संबंधितांना जाहीर आव्हान देताना पवार म्हणाले, ‘‘राज्य सहकारी बँकेने बारा सहकारी साखर कारखाने चालवायला देण्यासाठी टेंडर काढले आहे. ज्यांना वाटत असेल तिथल्या शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो त्यांनी टेंडर भरा. चांगल्या भावासोबत बोनस-पगार-वाहतूक-तोडणी यापोटी चांगला मोबदला देणार असाल, तर जरूर कारखाना चालवायला घ्या.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.