शेती 'डिजिटल' करायची? ‘वनामकृवि’त स्थापन होणार सेंटर ऑफ एक्सलन्स

या प्रकल्पांमधील प्रशिक्षित तज्ज्ञ शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याना डिजिटल शेती तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतील. कौशल्‍यप्राप्‍त प्रशिक्षणार्थीच्‍या माध्‍यमातून कमी खर्चात यंत्रमानव, ड्रोन्स तसेच स्वयंचलित यंत्राआधारे शेती करण्‍यासाठी हे तंत्रज्ञान लहान तसेच मध्यम शेतकऱ्यांना उपयुक्‍त ठरणार आहे. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वनामकृवि, परभणी
शेती 'डिजिटल' करायची? ‘वनामकृवि’त स्थापन होणार सेंटर ऑफ एक्सलन्स
शेती 'डिजिटल' करायची? ‘वनामकृवि’त स्थापन होणार सेंटर ऑफ एक्सलन्स

परभणी : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये देशातील एकमेव डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित प्रगत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (CAAST – Centre for Advanced Agricultural Science & Technology) स्‍थापन करण्‍यात येणार आहे. या प्रकल्‍पास मंजुरी दिल्याचे राष्ट्रीय संचालक डॉ. राकेशचंद्र अग्रवाल यांनी विद्यापीठास पत्राद्वारे कळविले आहे. हा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा प्रकल्‍प देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्‍प ठरणार आहे. २०१९ ते २०२२ या तीन वर्षे कालावधीसाठी हा प्रकल्प संकल्पित असून, त्यासाठी १८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  कुलगुरू डॉ. अशोक ढवण, माजी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या प्रेरणेतून शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गोपाल शिंदे, प्रकल्प समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी डिजिटल तंत्रज्ञान भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीस अनुकूल बनविण्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्ययबळ निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प तयार केला. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी उत्‍पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन आणि स्‍वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती यावरील सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍प सादर केला होता. या केंद्राद्वारे यंत्रमानव (रोबोट), ड्रोन आणि स्वयंचलित डिजिटल यंत्रणा विविध संशोधन प्रयोगशाळा तयार केली जाणार आहेत. कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थी डि‍जिटल शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्‍न करणार आहेत. त्यासाठी परभणी कृषी विद्यापीठाने अॅग्री-रोबोट्स, अॅग्री-ड्रोन्स व अॅग्री-स्वयंचलित यंत्राच्या तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन आणि बेलारुस येथील अग्रगण्‍य विद्यापीठांशी सामंजस्य करार केला आहे. पवई आणि खरगपूर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणून सहकार्य लाभणार आहे. हवामान आधारित डिजिटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे प्रक्रिया, रोपवाटिका स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल मशिनरी केंद्र व अन्नप्रक्रिया स्वयंचलित केंद्र या चार विभागात या केंद्राचे कार्य चालणार आहे. दर्जेदार आणि अधिक कृषी उत्पादनासाठी भारतीय शेतीत यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढण्‍यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळनिर्मिती करण्यात येणार आहे. डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकरीता एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राहणार आहे. या माध्यमातून प्रसार व मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याचा लाभ लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल शेती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे संपर्काचे जाळे तयार होणार आहे. डिजिटल शेतीसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान ३०० उच्चतम कौशल्यप्राप्त कृषी उद्योजकनिर्मिती करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या तज्ज्ञ गटामध्ये प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. मदन पेंडके, डॉ. भगवान आसेवार, डॉ. मेघा जगताप, प्रा. संजय पवार, डॉ. व्ही. के. इंगळे, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. विनोद शिंदे, डॉ. धीरज कदम, डॉ. डी. व्ही. पाटील, डॉ. गोदावरी पवार, डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. एस. आर. गरुड, डॉ. बी. एस. आगरकर, डॉ. आर. बी. क्षीरसागर, डॉ. वीणा भालेराव, डॉ. प्रवीण कापसे आदींचा समावेश आहे. याचबरोबरीने अन्य ४० शास्त्रज्ञांची उपसमिती असणार आहे. प्रगत देशातील शेतीत मोठ्या प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्राचा वापर होत आहे. परंतु भारतीय शेतीस अनुकूल असे तंत्रज्ञान वापरण्याबाबत हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल. - डॉ. गोपाल शिंदे, प्रमुख शास्त्रज्ञ  ..................... या प्रकल्पाद्वारे शेतीच्या‍ डिजिटलकरणासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल. त्यांचा उपयोग देशातील तसेच राज्यातील कृषी विकासात होणार आहे. - डॉ. राजेश कदम, प्रकल्प समन्वयक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com