मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा पंचनाम्याविना

मोसंबीची दीडशे झाडं होती. दुष्काळात पदरमोड करून जवळपास दीड लाखाचं पाणी इकत आणून बागेला घातलं. पुढे पाणीच न मिळाल्यानं बाग सोडून द्यावी लागली. जवळपास दहा वर्षं सांभाळलेली झाडं गेली, त्याचा पंचनामा नाही. दुष्काळ निधीत दहा हजार पाचशे रुपये मिळाले तेवढेच. - डिगांबर ढाकणे, शेतकरी, देवगाव,
फळबाग
फळबाग

औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील बहुवार्षिक फळपीकधारकांची अवस्था बिकट झाली आहे. यंदा तरी उत्पन्न मिळेल या आशेने खर्च केलेल्या अन्‌ वाळलेल्या झाडांशिवाय काहीच हाती न उरलेल्या फळबागधारकांना यंदा फळबागा डोळ्यांदेखत उद्‌ध्‌वस्त होताना पाहण्याची वेळ आली. त्यामुळे वाळलेल्या बागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊन प्रत्येक फळपिकांचे उत्पादनक्षम क्षेत्र वाचले किती, हे दाखवून फळबागधारकांना उभारी देण्याचे काम निदान येत्या काळात शासन करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  कागदावरील आकड्यांनुसार मराठवाड्यातील मोसंबी, आंबा, डाळिंब, सीताफळासह इतर फळपिकांच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसतात. परंतु २०१२ पासून आजपर्यंतच्या सात वर्षांच्या कार्यकाळात आलेल्या दुष्काळाच्या संकटांनी किती बागा गेल्या, किती बचावल्या, नव्याने लागवड केल्यानंतर टिकण्याऐवजी आलेल्या दुष्काळाच्या संकटानं संपल्या, आदी सर्व गोळाबेरीज करून पीकनिहाय बागांचे नेमके क्षेत्र किती याचे उत्तर कुणाकडेच मिळत नसल्याची स्थिती आहे. फळबागांचे क्षेत्र नेमके किती याचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला, तर यंत्रणेकडून जुनीच आकडेवारी पुढे केली जाते. यंदा तर दुष्काळाचं संकट आजवरच्या संकटात सर्वांत मोठं असतानाही ना बागा वाचविण्यासाठी २०१२ प्रमाणे ना मदत झाली, ना दुष्काळानं संपलेल्या बागांचे पंचनामे झाले. इतर पिकांप्रमाणे फळबागधारकांना दुष्काळ निधी स्वरूपात दोन हेक्‍टरच्या मर्यादेत हेक्‍टरी जवळपास अठरा हजारांप्रमाणे मदत मिळाल्याचे शेतकरी सांगतात; परंतु आशेनं बागा वाचविण्यासाठी विकतच्या पाण्यावर लाखो खर्च झाले, तरीही बाग गेली. शिवाय महत्‌प्रयासाने बचावलेल्या बागांना आता पडणाऱ्या पावसामुळे धोका होऊ शकतो. त्यामुळे मिळालेला दुष्काळ निधी तुटपुंजाच म्हणावा लागेल. त्यामुळे शासनाने अनेक वर्षं बागा सांभाळल्यानंतरही त्या गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फळबागा उभ्या करण्यासाठी भक्‍कम आधार देण्याची अपेक्षा फळबागधारकांना आहे. आजवर गेलेल्या बागांच्या पंचनाम्याची तसदी न घेणारे शासन व त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन किती तत्परतेने व गांभीर्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेकडे लक्ष देईल, हा खरा प्रश्न आहे. 

शासनाचे दुर्लक्ष लाखो खर्चत घोट..घोट... पाणी पाजून बागा जगविण्याचा प्रयत्न केला; पण पाण्याअभावी डोळ्यांदेखत बागा उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ आली. अजूनही अपेक्षित पाऊस नसल्याने उरलीसुरली झाडंही जाण्याच्या मार्गावर आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही बागा वाचविता आल्या नाहीत. बागा वाचविण्यासाठी धडपडताना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्याकडे दुर्लक्ष केले गेले. थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या क्रमांकावर सूचनेनुसार व्हॉट्‌सॲपने कळवूनही उपयोग झाला नाही. पुन्हा स्मरण देऊनही पदरी निराशाच आली. त्यामुळे आता याविषयी मंगळवारी (ता. २५) विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, असे ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील यांनी सांगितले. दुष्काळानं संपलेल्या फळबागांचे तत्काळ पंचनामे व बहुवार्षिक फळपिकांना प्रतिझाड किमान एक हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. शिवाय पारदर्शकतेची जबाबदारी झटकण्यासाठी आलेली ''ड्रॉ'' पद्धत न वापरता अनेक वर्षांच्या बागा गेलेल्यांना फळबाग लागवड योजनेसाठी प्राधान्य देण्याची मागणी संजय मोरे यांनी निवेदनातून केली आहे. 

‘अन्नदाता’ने घेतली कृषी राज्यमंत्र्यांची भेट अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी उद्ध्वस्त झालेल्या फळबागधारकांच्या प्रश्नावर मंगळवारी (ता. २५) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली. दुष्काळानं फळबाग गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान १ लाखाची मदत करा, अनेक वर्षांची बाग गेल्यानंतर पुन्हा नव्याने फळबाग लावू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रमाने पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com