अकोल्यात ‘कापूस ते कापड’  प्रक्रियेसाठी उद्योगांना पाठबळ

एकाच व्यवसायाशी निगडित उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योगांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान करण्यासाठी पाठबळ देण्यात आले आहे.
'Cotton to cloth' in Akola Support industries for processing
'Cotton to cloth' in Akola Support industries for processing

अकोला ः एकाच व्यवसायाशी निगडित उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योगांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ या प्रक्रियेचे चक्र जिल्ह्यात गतिमान करण्यासाठी पाठबळ देण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत २७ उद्योग एककांचे एकत्रीकरण ‘दि संघा टेक्स्टाइल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या नावाने तयार करण्यात आले असून, त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे बंगळूर येथील एजन्सीमार्फत एका आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचे दोन लाख टी शर्टस बनविण्याची ऑर्डरही या उद्योगास मिळाली आहे. एक नवे पाऊल पुढे पडू लागले आहे. 

अकोला हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग पूर्वी होते. दरम्यानच्या काळात उद्योग लयाला गेला. पुन्हा काही वर्षांत छोटे -छोटे उद्योग उभे राहत आहेत. आता या उद्योगांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ येथेच तयार व्हावे, अशी ही संकल्पना राबवल्या जाऊ लागली. या संकल्पनेला जिल्ह्यात ‘एक गाव एक उत्पादन’, हे रूप देऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी चालना दिली होती. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कापसावर प्रक्रिया करणाऱ्या एककांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्स्टाइल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या उद्योग समूहाचे एकत्रीकरण करण्यात आले. सद्यःस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून २७ युनिट कार्यरत आहेत. सूक्ष्म व लघू उद्योग एकक विकास कार्यक्रमात हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी ५० लाख रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.

या उपक्रमाची सुरुवात सम्यक जिनिंग चिखलगाव येथून झाली. या उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे व कापड ते थेट वस्त्र तयार करेपर्यंत प्रक्रिया येथेच कराव्यात यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी त्यास चालना देऊन एकूण ३० जणांना एकत्र आणून त्यांना टेक्स्टाइल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून २७ जणांनी यात सहभाग घेतला. 

भांडवलासाठी ५० लाखांचे कर्ज प्रत्येक उद्योजकास ५० लाख रुपये भांडवल असे साडे तेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार युनियन बॅंकेने दिले आहेत. या शिवाय मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाली आहेत. तसेच साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते पाणी आणि वीज या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत. 

‘कापूस ते कापड’ या उद्योगामध्ये कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे, धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे आणि कापडाचे परिधाने बनविणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जात आहेत. साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होऊ लागली. शेलापूर येथे धाग्याचे कापड बनविणे, रंगविणे याप्रकारची युनिट्स काम करीत आहेत. तर बोरगाव मंजू येथे कापसापासून धागे बनविणे व कापडापासून परिधाने बनवण्याची कामे होतात. यासाठी ६०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून सद्यःस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ११० कामगार काम करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com