
वाशीम ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप हंगामात १५३० कोटी रुपये पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक दिलेला असून, २१ जूनअखेर केवळ २५७ कोटी ३१ लाख रुपये वितरित झाले आहेत. ही सरासरी केवळ १६.८२ टक्के असल्याने नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. वाशीम जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ८९० शेतकरी सभासदांना १५३० कोटी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज काढताना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत आहे. कागदपत्रे बँकांमध्ये दिल्यानंतर कर्जमंजुरीची प्रक्रिया संथ गतीने केली जात आहे. या जिल्ह्यात काही बॅंकांमध्ये शेतकऱ्यांकडून कोरे धनादेशसुद्धा घेतले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपास बॅंकांनी हात आखडता घेतलेला असल्याचे अत्यल्प कर्ज वितरणावरून स्पष्ट झाले आहे. जून महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. वाशीम जिल्ह्यात पावसाने हजेरी दिल्याने काही भागांत पेरणीसुद्धा सुरू झाली. शेतकऱ्यांनी सावकारांकडून, हातउसनवारीचे व्यवहार करून शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणले. आता या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याची आशा लागलेली आहे. असे असताना शेतकऱ्यांना पीककर्ज मात्र मिळेनासे झालेले आहे. २१ जूनपर्यंत केवळ ३१ हजार १३६ शेतकरी सभासदांना २५७ कोटी ३१ लाख रुपये मिळाले आहेत. अद्याप १ लाख ६३ हजार शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. १५३० पैकी २५७ कोटी ३१ लाख म्हणजे अवघे १६.८२ टक्के पीक कर्जवाटप झालेले आहे. बँकांनी पीककर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोचावे ः मोडक वाशीम जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पीककर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराकडे जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी बँकांनी पीककर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोचावे, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. या वेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक दत्तात्रेय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत श्री. मोडक म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करणे हे बँकांचे महत्त्वाचे काम आहे. बँकांपर्यंत पीककर्जासाठी शेतकरी का येत नाहीत, याबाबतची वस्तुस्थिती बँकांनी जाणून घ्यावी. बँका शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा आक्षेप असतो, तो दूर करण्यासाठी बँकांनीच आता सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या बँकांच्या शाखांनी पीक कर्जवाटपात कामगिरी केलेली नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी दर सोमवारी लेखी स्वरूपात कारणे सादर करावीत, असे त्यांनी या वेळी सांगितले. या बॅंकांना दिले आहे उद्दिष्ट जिल्ह्यात पीक कर्जवाटपासाठी अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एकूण ११७ शाखांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.