अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनियमितता

आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम समजल्या जाणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आर्थिक अनियमितता वाढल्याचा आरोप जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या बाबी लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनियमितता Akola Agricultural Produce Market Irregularities in the work of the committee
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनियमितता Akola Agricultural Produce Market Irregularities in the work of the committee

अकोलाः आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम समजल्या जाणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आर्थिक अनियमितता वाढल्याचा आरोप जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या बाबी लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. शनिवारी (ता. ११) सायंकाळी येथील विश्रामगृहात जागर मंचाचे संयोजक कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तर हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे यांनी ‘ॲग्रोवन’ला सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे, यांनी सन २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण जिल्हा विशेष लेखा परीक्षक कैलास सोळंके यांनी केल्याचे सांगत त्या अहवालात संचालक मंडळाने केलेल्या अनियमितता व इतर गंभीर बाबी नमूद केल्याची माहिती दिली. उपबाजार आवाराच्या सात एकर जागेचा दुरुपयोग, शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत भ्रष्टाचार, गाड्यांची विक्री, सेस वसुली, अंतर्गत लेखापरीक्षण फी, बाजार समितीशी संबंधित नसलेले लाखो रुपयांचे खर्च, शेतकरी अर्थसाहाय्य योजना व सिंचन अनुदान वाटप, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती अनुदान, वसंत कृषी प्रदर्शन, बोगस व्यापारी-अडत्यांना बेकायदेशीर ३८ गाळ्यांचे वाटप, पाच कोटींचे भाग प्रमाणपत्र, नियमबाह्य पुतळा उभारणी, सुरक्षा यंत्रणेवर खर्च तसेच हिशोब आर्थिक पत्रके अशा १४ मुद्यांवर पत्रकारांना लेखा परीक्षणात घेतलेल्या आक्षेपांची माहिती दिली. बाजार समितीच्या कारभाराबाबत या खात्याच्या मंत्र्यांकडे सविस्तर तक्रार केली असून, त्यांनी  चौकशीचे आदेश दिल्याची माहिती या वेळी पत्रकारांना देण्यात आली.  बंद सूतगिरणीला दिले पाच कोटी अकोल्यातील बंद अवस्थेत असलेल्या निळकंठ सहकारी सूतगिरणीला बाजार समितीने २० ऑक्टोबर २०१८मध्ये पाच कोटींचे भाग भांडवल दिले. यासाठी पणन संचालकांची मान्यता घेण्यात आली नव्हती, असे कृष्णा अंधारे म्हणाले. आजपर्यंत या सूतगिरणीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे भाग प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त करून घेतलेले नाही. बाजार समितीने निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

प्रतिक्रिया बाजार समितीच्या व्यवहारांबाबत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही परवानगी घेऊनच कामे केली आहेत. विकास करायला कोणी जात असेल तर अशा प्रकारे आडकाठी आणल्या जाते. या पूर्वीही आरोपांची चौकशी झालेली आहे. आता दुसऱ्यांदा होत असलेल्या चौकशीतून सत्य काय आहे ते बाहेर येईलच. बाजार समितीने सातत्याने शेतकरी विकासाचाच विचार केला आणि तोच अजेंडा आम्ही पुढे नेत आहोत. अकोल्यात शेतकऱ्यांच्या ज्या काही चांगल्या संस्था आहेत, त्यात बाजार समिती अव्वल आहे. चांगली संस्था बदनाम करण्याचा हा प्रकार दिसतो.   -शिरीष धोत्रे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com