मुंबई : राज्य सरकारकडील तूरडाळीची राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी, यासाठी अशा दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये इतके कमिशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची विक्री राज्यातील रास्त धान्य दुकानांतून करण्याचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार रास्तभाव दुकानदारांना अन्नधान्य वितरणासाठी पॉस मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारानुसार वितरित होणाऱ्या तूरडाळीस दीड रुपये प्रतिकिलो व पॉस मशिनव्यतिरिक्त होणाऱ्या तूरडाळीस ७० पैसे प्रतिकिलो एवढे कमिशन देण्यात येत होते. तूरडाळीचा विक्री दर ५५ रुपये प्रतिकिलो आहे. सरकारकडील तूरडाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
राज्यात रास्तभाव दुकानातून आतापर्यंत एकूण १ लाख ६६ हजार ७५ क्विंटल तूरडाळीचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी १ लाख ५१ हजार २८९ क्विंटल तूरडाळ वितरित झाली आहे. यात मे महिन्यासाठी रायगड ४४४ क्विंटल, नंदुरबार २३८ क्विंटल, सातारा २२५० क्विंटल, सांगली ३८३६ क्विंटल, कोल्हापूर २९०० क्विंटल, जालना ४३९ क्विंटल, बीड ५०० क्विंटल, उस्मानाबाद १५० क्विंटल, अकोला ५०० क्विंटल, वाशीम ४०० क्विंटल, अमरावती १७५० क्विंटल, यवतमाळ २६७८ क्विंटल, नागपूर २००० क्विंटल, वर्धा ४०० क्विंटल, भंडारा २४५० क्विंटल, गोंदिया ४००० क्विंटल, गडचिरोली ५९५ क्विंटल, पालघर ९०३ क्विंटल असे एकूण २६ हजार ४३५ क्विंटल वाटप मे महिन्यासाठी झाले आहे.
डिसेंबर २०१७ पासून राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तूरडाळ विक्रीसाठी देण्यात आली आहे. डिसेंबर २०१७ ला राज्यात ८४ हजार ४९९ क्विंटल, जानेवारी २०१८ मध्ये ३७ हजार ५३३ क्विंटल, फेब्रुवारीमध्ये ८ हजार ८१२ क्विंटल, मार्च ९८० क्विंटल, एप्रिल ६ हजार ४३६, आणि मे महिन्यासाठी २६ हजार ४३५ तूरडाळ वाटप करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.