

मुंबई: शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली असून बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान उपयुक्त ठरेल. त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’ अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कि शेतकऱ्यांनी संघटित होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कृषी प्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. त्यासाठी शेतातून थेट शहरातल्या घरापर्यंत अशा प्रकारची साखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत. शेतकरी संघटित होणे गरजेचे असून शेती उद्योगक्षम होऊन अन्नदाता सुखी झाला पाहिजे. ‘‘बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे याचे नियोजन करुन महाराष्ट्रात विभागवार शेती करावी. दर्जेदार उत्पन्न घेऊन ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना यशस्वी करावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी निर्माण करतानाच गाव पातळीवर पहिल्यांदाच शेती संदर्भात ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही १० हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी शासनाने केली आहे. शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सन्मान कक्षाची स्थापना राज्यभरात करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी लहान अवजारे विकसित केली त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून हे संशोधन अवजार उत्पादन कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला थेट ग्राहकाला उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक तेथे जागा उपलब्ध करुन देऊ असेही त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातून फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. राज्यात भाजीपाला रोपांची मागणी वाढत असून भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५०० लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘‘शेतकऱ्याला परमेश्वराच्या स्थानी मानणाऱ्या राज्यात कृषी विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ असे कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी भंडारा येथील देवानंद चौधरी, ठाणे जिल्ह्यातील जानकी बागले, औरंगाबाद जिल्ह्यातील दिपक चव्हाण या शेतकऱ्यांनी संवाद साधला. यावेळी फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व तंत्रज्ञान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह अकोला, ठाणे, औरंगाबाद, भंडारा येथील शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले...
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.