अत्याधुनिक पॅकहाउसद्वारे केळी निर्यात

जगात केळीसाठी प्रसिद्ध जळगाव जिल्ह्यात सात- आठ वर्षांत फिलिपिन्स देशाच्या धर्तीवर तीन अत्याधुनिक पॅकहाऊस साकारले आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातून परदेशातील केळी निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे.
Banana export
Banana export
Published on
Updated on

जगात केळीसाठी प्रसिद्ध जळगाव जिल्ह्यात सात- आठ वर्षांत फिलिपिन्स देशाच्या धर्तीवर तीन अत्याधुनिक पॅकहाऊस साकारले आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातून परदेशातील केळी निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. सुमारे दहा ते बारा कंपन्या निर्यातीत उतरल्या आहेत. केळी उत्पादकांना प्रचलित दरांच्या तुलनेत अधिक दर मिळत आहेत.

अलीकडील काळात शेतीमालाला परराज्यांतील तसेच निर्यातीच्या बाजारपेठा मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. खानदेशातील केळी उत्पादकही त्यादृष्टीने प्रयत्नशील झाले. जिद्दी, मेहनती शेतकऱ्यांनी केळी उत्पादनासंबंधीचे ‘फ्रूटकेअर’ तंत्रज्ञान आत्मसात करून निर्यातक्षम केळी उत्पादित करण्यास सुरुवात केली. दरवर्षी किमान ५० हजार हेक्टरवर जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड होते. रावेर पट्ट्यात सर्वाधिक २० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असते. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात मृग बहर  तर चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर भागांत कांदेबाग केळी अधिक असते. 

केळीची गुणवत्ता वाढवली  केळीची लागवड पाच- सहा वर्षांत गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात वाढली. तेथील केळी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशात पोहोचू लागली. परिणामी, जळगावच्या केळीला उत्तर भारतात स्पर्धा तयार झाली. मग इथल्या शेतकऱ्यांनी केळीची गुणवत्ता अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला. रावेर, यावल, मुक्ताईनगर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, नेपानगर भागांतही दर्जेदार केळीचे उत्पादन घेतले जाते. या केळीला परदेशातील बाजारपेठ मिळावी यासाठी जागतिक केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सतत काम केले. 

पॅकहाउसची संकल्पना  केळी निर्यातीसाठी काय आवश्यक आहे याचा विचार करताना अत्याधुनिक केळी पॅक हाउसची संकल्पना समोर आली. फिलिपिन्स देशातील पॅकहाउसची पाहणी झाली. त्या धर्तीवरचे पॅकहाउस जैन इरिगेशन कंपनीअंतर्गत केळीसाठी कार्यरत फार्मफ्रेश कंपनीने सर्वप्रथम उभारले. यानंतर तांदलवाडी (ता. रावेर) येथे कृषिभूषण प्रेमानंद व प्रशांत या महाजन चुलत बंधूंनी व मध्य प्रदेशातील नाचणखेडा (जि. बऱ्हाणपूर) येथे सुनील चौधरी यांच्या पुढाकाराने असे पॅकहाउस उभे राहिले. त्याची मदत केळीची स्वच्छता, पॅकिंग, शास्त्रीय पद्धतीने साठवणूक यासाठी होऊ लागली आहे. 

केळी निर्यातीला गती  आता निर्यातदार कंपन्या जिल्ह्यात तीन वर्षांपासून केळीची खरेदी करीत आहेत.अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी डोलनेही रावेर भागात निर्यातीत सहभाग घेतला. पॅकहाउसमध्ये कमी दर्जाची केळी वेगळी करणे, स्वच्छता, लेबलिंग, पॅकिंग, साठवणूक या सुविधांबरोबर प्रीकूलिंग चेंबरची व्यवस्थाही उभारली आहे. महाजन बंधूंच्या पॅकहाउसमध्ये ८० टन साठवणूक क्षमतेचे प्रीकूलिंग चेंबर आहे.  केळी रेफर व्हॅनच्या माध्यमातून जेएनपीटी बंदर (मुंबई) येथे पाठविली जातात. या सुविधेमुळे केळीची जिल्ह्यातील निर्यात वाढली आहे.

निर्यातीसंबंधी महत्त्वाचे 

  • जानेवारी ते जून निर्यात हंगाम जोमात.
  •  अधिकाधिक निर्यात आखातात. रशिया, युरोपात निर्यात वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम व मध्यवर्ती ‘कोल्ड स्टोअरेज’साठी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू. 
  • दरांवरील दबाव दूर स्थानिक स्तरावर केळी दरांवर खानदेशात जानेवारीपासून दबाव असायचा. मात्र निर्यात वाढू लागल्याने तो दूर झाला आहे. कमाल १४ रुपये प्रतिकिलोचा दर निर्यातीसाठी मिळाला. तर किमान ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर लॉकडाउनमध्ये मिळू शकला. खरेदीदारांची संख्या वाढली आहे. अलीकडे पंजाब, जम्मू, दिल्ली येथील सुपर शॉप्स, मॉल्समध्येही बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठविण्याची कार्यवाही सुरू झाली.

    प्रत्येक तालुक्यात पॅकहाउस गरजेचे आहे. मध्यवर्ती ‘कोल्ड स्टोअरेज’ही उभारणे आवश्‍यक आहे. यामुळे केळीची साठवणूक व निर्यात वाढेल. रशिया, युरोप व अन्य देशांत केळीला मोठी मागणी असते. तेथे निर्यात सुरू झाली तर केळीची मागणी बारमाही टिकून राहील. चांगले दर शेतकऱ्यांना मिळतील.  - के. बी. पाटील, जागतिक केळी तज्ज्ञ

     केळीच्या बाजारात स्पर्धा व दरांवरील दबाव दूर करण्यास निर्यात वाढीमुळे मदत झाली आहे. आमचे पॅकहाउस केळी निर्यातदार कंपन्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येते.      - प्रेमानंद महाजन, ९७६३८९३७७७ महाजन बनाना एक्स्पोर्ट, तांदलवाडी  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com