
यंदा देशात गव्हाचं विक्रमी उत्पादन (Record Wheat Production) होण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात गव्हाच्या किंमती (Wheat Rate) आभाळाला भिडल्या होत्या. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी गव्हाचा पेरा (Wheat Sowing) मोठ्या प्रमाणावर वाढवला.
शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड केली. तसेच यंदा हवामान गव्हाला पोषक राहिलं. त्यामुळे यंदा गव्हाचं बंपर उत्पादन होईल, असा शास्त्रज्ञांचा आणि व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
गव्हाचं उत्पादन वाढलं तर केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडेल. गव्हावरची निर्यातबंदी उठवण्याचा विचार सरकार करू शकेल. तसेच गेल्या काही महिन्यांपासून अन्न महागाई निर्देशांक सतत वाढत असल्यामुळे निर्माण झालेली चिंता काहीशी कमी होऊ शकते.
‘‘गव्हाचे वाढलेले लागवडक्षेत्र आणि अनुकूल हवामान यामुळे उत्पादनात वाढ होईल. यंदा गव्हाचे उत्पादन ११२ दशलक्ष टनावर पोहोचण्याची चिन्हे आहेत,'' असे भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेचे संचालक ग्यानेंद्र सिंह यांनी रॉयटर्सला सांगितले. गेल्या वर्षी गहू उत्पादन १०६ दशलक्ष टनाच्या घरात राहिले होते.
उष्णतेच्या लाटेमुळे गहू निर्यातबंदी
भारत हा गव्हाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक आहे. मे २०२२ मध्ये केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात मोठी घट झाल्याने अन्नसुरक्षेसाठी गव्हावर निर्यातबंदी घातल्याचे सांगण्यात आले होते.
रशिया-युक्रेन युध्दामुळे गव्हाची जागतिक पुरवठासाखळी विस्कळीत झालेली होती. त्यामुळे निर्यातीच्या बाजारपेठेत भारतीय गव्हाला प्रचंड मागणी होती. परंतु सरकारने निर्यातबंदीचे हत्यार वापरून देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा वाढवण्याला प्राधान्य दिले.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातील गहू उत्पादन १०९.५ दशलक्ष टनावरून १०६.८ दशलक्ष टनावर घसरले. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अंदाजानुसार गहू उत्पादन १०० दशलक्ष टन राहिले.
तर व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादन ९५ दशलक्ष टनावर घसरले. उत्पादनात मोठी घट आल्याने निर्यातबंदी करूनही देशात गव्हाचे दर चढेच राहिले.
यंदा हवामान अनुकूल
यंदा मात्र उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील हवामान गहू पिकासाठी पोषक राहिले आहे. ‘‘सध्याची थंडीची लाट पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनी गव्हाच्या नव्या वाणांची लागवड केली आहे. हे वाण वातावरणातील बदलाशी अधिक चांगल्या पध्दतीने जुळवून घेतात,'' ग्यानेंद्र सिंह म्हणाले.
भारतात एकाच हंगामात गव्हाचे पीक घेतले जाते. साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या सुमारास गव्हाची लागवड केली जाते. तर काढणीला मार्चपासून सुरूवात होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गहू लागवडीत एक टक्का वाढ झाली आहे. यंदा देशात सुमारे ३३२ लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे.
आतापर्यंत पिकासाठी हवामान चांगलं राहिलं आहे. परंतु फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमान कमी राहिले पाहिजे, असे नवी दिल्लीतील निर्यातदाराने सांगितले. मागच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.