
देशात २०२३ मध्ये गव्हाचं बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात गव्हाच्या दरातील (Wheat rate) तेजी आणि परतीचा पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावा (Soil Moisture) टिकून राहिल्याने शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाकडे वळाले आहेत. मागच्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात घट आली होती. आताही पिकाच्या पुढील अवस्थेत उष्णतेच्या लाटेची टांगती तलवार आहे. परंतु सध्या तरी वाढत्या क्षेत्रामुळे उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. गव्हाचे दर भडकल्यामुळे उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण आता गहू उत्पादनात वाढ झाली तर सरकार गहू निर्यातीवरची (Wheat Export) बंदी उठवण्याचा विचार करू शकते. वाढत्या महागाईमुळे जेरीस आलेल्या सरकारला गहू उत्पादनातील वाढीमुळे दिलासा मिळेल.
पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश यांसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गव्हाचे पीक वर्षानुवर्षे घेतले जात आहे. देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्ये म्हणून त्यांची ओळख आहे. या पारंपरिक गहू पट्ट्यात गव्हाच्या लागवडीत फारशी वाढ झालेली नाही. जवळपास मागच्या वर्षीइतकाच किंवा किंचित अधिक पेरा झाला आहे. परंतु पश्चिमकेडली राज्यांनी मात्र गहू लागवडीत मोठी आघाडी घेतली आहे. शेतकरी जिथं कडधान्य आणि तेलबिया पिकवतात त्याठिकाणी सुद्धा यंदा गव्हाचा पेरा वाढलाय. ओलम अॅग्रो इंडियाचे उपाध्यक्ष नितीन गुप्ता रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "गव्हाच्या दरात वाढ झालीय. गुजरात आणि राजस्थान या राज्यांनी गहू लागवडीत मोठी आघाडी घेतलीय. शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर सुद्धा गव्हाची पेरणी केलीय." देशात २०२२ मध्ये गव्हाच्या किंमती ३३ टक्क्यांनी वाढल्या असून दर प्रति टन २९ हजार रुपयांवर गेले.
गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रति टन २१,२५० रुपये आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यावरून उत्पादनातील घट दिसून येते. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमती भडकल्या. सोबतच जागतिक बाजारात गव्हाची कमतरता भासू लागली. यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी केली जाते आणि मार्चमध्ये पीक कापणीला येतं.
भारतात वर्षभरात फक्त एकदाच गव्हाची पेरणी केली जाते.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू पेरणीचा हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी १५.३ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी केली. गेल्या वर्षीपेक्षा पेरणी सुमारे ११ टक्के जास्त आहे.पंजाब आणि हरियाणा ही राज्य भारताचे अन्नाचे कोठार म्हणून ओळखले जातात. तिथे शेतकऱ्यांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी गव्हाची लवकर पेरणी केली आहे. वाढलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकवन आणि शरबती यांसारख्या गव्हाच्या वाणांची निवड केली आहे. नवी दिल्लीतील व्यापारी राजेश पहारिया जैन म्हणाले, "गव्हाचं क्षेत्र वाढलंय, पण पिकाच्या पुढील वाढीच्या अवस्थेत तापमान कमी राहणं गरजेचं आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये हवामान अनुकूल राहणं आवश्यक आहे."
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.