
Jalgaon News: खानदेशात कलिंगडाची लागवड सुरूच आहे. लागवड यंदा वाढली असून, सुमारे सात हजार हेक्टरवर कलिंगड पीक सध्या आहे. त्यात पुढे किंचित वाढ होईल, असे दिसत आहे. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प आहे. अर्ली पिकात उत्पादन एकरी १० ते आठ टन एवढेच येत आहे. तर काही भागात कलिंगड पिकाला थंडी व विषम वातावरणाचा फटका बसला आहे.
कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा, जळगावातील जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा भागात अधिकची वाढली आहे. या भागातील लागवड ३० टक्के वाढली आहे. अनेकांनी रमझान महिन्यात आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते. परंतु प्रतिकूल वातावरण व अधिकचा खर्च यामुळे उत्पादन कमी आहे. या क्षेत्रात पीक काढणीवर आहे. पिकात काढणी काही भागात सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातही लागवड यंदा अधिक वाढली आहे. मागील हंगामात जिल्ह्यात डिसेंबर ते मार्च या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड १२०० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. परंतु यंदा डिसेंबर व जानेवारातील लागवड वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी रमझान महिन्यातील बाजार हेरण्यासाठी डिसेंबर सुरवातीस लागवड केली आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा भागांत अधिक आहे.
अन्य भागात मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ७००० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड या महिन्यातही काही शेतकरी करतील. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही लागवड होईल. परंतु ही लागवड कमी राहील. कारण उष्णतेत पीक काढणीवर येत असल्याने मार्चची लागवड कमी असते. ही लागवड जेमतेम ४०० ते ४५० हेक्टरपर्यंतच होईल, असा अंदाज आहे. यात सध्या पिकाचे रोगराईत नुकसान झाले. दरही कमी आहेत. त्यात मोठे वित्तीय नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. यामुळे पुढे लागवड घटेल, असे दिसत आहे.
कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील लागवड ३०० ते ३५० हेक्टरपेक्षा अधिक आहे. यंदाही जामनेरातील लागवड ४०० हेक्टरपर्यंत आहे. जामनेरातील हिवरखेडा, पळासखेडा, हिंगणे, नेरी, जामनेर, सामरोद, गारखेडा, तोंडापूर व अन्य भागात कलिंगडाची मोठी लागवड करण्यात आली आहे.
चोपड्यातही माचले, गोरगावले, सनपुले, लोणी, पंचक, यावलमधील मनवेल, किनगाव, साकळी व परिसरात कलिंगड पीक आहे. या भागतही लागवड यंदा अधिक झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात कलिंगड लागवड वाढली आहे. मध्य प्रदेशातील जळगावलगतच्या भागात लागवड वाढली आहे. तेथील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापूर, नाचणखेडा, दापोरी, फोपनार, लोणी व तापीकाठालगत लागवडीत मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. पण तेथे पीक प्रतिकूल वातावरणाने खराब झाले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
खरबूज अल्प
खानदेशात खरबुजाची लागवड मागील दोन-तीन वर्षे ६०० ते ७०० हेक्टरपेक्षा अधिक असायची. यंदा खरबूज लागवडदेखील कमी आहे. ही लागवड यंदा जेमतेम ३०० हेक्टर एवढी आजघडीला असल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.