Kolhapur News : गेल्या अनेक वर्षांपासून साखर उद्योग मागणी करत असलेल्या साखरेच्या किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करण्याच्या विचारात केंद्र शासन आहे. येत्या काही दिवसांत शासनातर्फे साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते, असे सूतोवाच नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमा वेळी केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी केले. कितीपर्यंत ही दरवाढ केली जाईल याबाबत मात्र अद्याप विचार झालेला नाही. सध्या एमएसपी ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे.
गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगाकडून सातत्याने ‘एमएसपी’त वाढ करण्याची मागणी होत आहे. यापुढे साखर उद्योगातील मातब्बर नेत्यांकडून केंद्राला सातत्याने या प्रश्नी साकडे घालण्यात येत आहे. एकीकडे एफआरपी दरवर्षी वाढवली जात असताना दुसरीकडे एमएसपीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यातच केंद्राने सातत्याने साखर विक्रीबाबत निर्बंध आणल्याने दरातही वाढ होत नसल्याचे चित्र आहे.
देशात २०१७-१८ मध्ये साखर उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यानंतर पुढील दोन वर्षे साखरेचे दर कोसळले आणि कारखान्यांवरील साखरेचा प्रतिकिलोचा दर २० रुपयांपर्यंत घसरला, ज्यावेळी साखरेचा उत्पादन खर्च ३० रुपये होता. म्हणजे किलोमागे १० रुपयांचे नुकसान झाल्याने संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत आला होता. त्या वेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघासह अन्य संघटनांनी दरवाढीची मागणी लावून धरली.
साखर उद्योगातून सातत्याने मागणी होत असल्याने केंद्राने २९०० रुपये प्रतिक्विंटल इतका एमएसपीचा दर निर्धारित केला. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडून ऊस आणि साखर दराचा आढावा घेऊन दरवर्षी एफआरपीचा दर ठरविला जातो. त्यानंतरही एफआरपीमध्ये वाढ झाली तरी ‘एमएसपी’मध्ये वाढ केली जात नसल्याने महासंघासह साखर उद्योगाने पुन्हा अन्न मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत साखरेची एमएसपी ३३०० रुपये करावी, अशी मागणी केली. त्यावर विचार होऊन शेवटी विक्री दर २९०० वरून ३१०० म्हणजे क्विंटलला २०० रुपये वाढ करण्यावर २०१९ ला शिक्कामोर्तब झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.