
फ्यूचर्स किमती : सप्ताह २९ मार्च ते ४ एप्रिल २०२५
१ एप्रिलपासून NCDEX मध्ये ऑगस्ट डिलिव्हरीसाठी मक्याचे व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी हळदीचे व्यवहार नव्याने सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यात NCDEX मध्ये कपाशीचे एप्रिल व नोव्हेंबर २०२५ आणि फेब्रुवारी व एप्रिल २०२६ डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत; त्याचप्रमाणे तेथे मक्याचे एप्रिल, मे, जून, जुलै व ऑगस्ट २०२५ डिलिव्हरीसाठी आणि हळदीचे एप्रिल, मे, जून, ऑगस्ट व ऑक्टोबर २०२५ डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील. MCX मध्ये कापसाचे मे, जुलै व सप्टेंबर २०२५ डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील.
गेल्या महिन्यात हळद वगळता सर्व पिकांनी (कापूस, कपाशी, मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर, कांदा व टोमॅटो) उतरता कल अनुभवला. कापसाचे व सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय भावसुद्धा घसरत आहेत. अमेरिकेच्या नवीन आयात धोरणामुळे शेतीमालाच्या किमतीवर नेमका काय परिणाम होईल याबद्दल अनिश्चितता आहे. जर त्यामुळे अमेरिकेत मंदी आली तर त्याचा परिणाम सर्व देशांवर होईल.
रब्बी कांद्याची आवक आता सुरू होईल. भारतात कांदा हे एक नाही तर तीन पीके आहेत (खरीप कांदा, उशिरा खरिपाचा कांदा व रब्बी कांदा). या तिन्ही कांद्याचे भाव ठरण्याची व त्यातील चढ-उताराची कारणे वेगवेगळी आहेत. गेल्या काही वर्षांतील रब्बी कांद्याचे सरासरी भाव खालील आलेखात दर्शवले आहेत. रबी उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षी कांद्याचे भाव वाढले होते.
रब्बी कांदा कमी नाशिवंत असल्यामुळे त्याचा साठा अधिक काळासाठी करता येतो. एप्रिल महिन्यात याचे भाव सर्वांत कमी असतात; त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत (कधी कधी ऑक्टोबरपर्यंत सुद्धा) ते वाढत राहतात. ही वाढ बहुतेक वेळा दुपटीपर्यंत जाते. काही वेळा ती तिपटीनेसुद्धा झाली आहे.
४ एप्रिल २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.४ टक्क्याने वाढून रु. ५३,७४० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव रु. ५४,४४० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १ टक्क्याने वाढून रु. १,४५७ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२७ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. २,२२५ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती ३ टक्क्यांनी वाढून रु. २,३४२ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,३६९ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ६.५ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ७.९ टक्क्यांनी वाढून रु. १४,६१४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती १२.५ टक्क्यांनी वाढून रु. १५,०६० वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १५,०४२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.९ टक्क्यांनी अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव रु. १६,३०० आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यांनी घसरून रु. ५,६०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,८८८ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,३४३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. आवक आता कमी होऊ लागली आहे. भाव या वर्षी वाढण्याची शक्यता कमी आहे.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,६५९ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७,४२८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात या सप्ताहात रु. १,३०९ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७०८ वर आली होती; या सप्ताहात ती रु. ५०० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.