Turmeric Cultivation : देशात तब्बल दीड लाख हेक्टरने हळद क्षेत्रात घट

Turmeric Market : देशात यंदा वेळेवर पाऊस झाला नाही. उशिरा आलेला पाऊस पुरेसा नसल्याचा फटका हळद लागवडीवर झाला.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Sangli News : देशात यंदा वेळेवर पाऊस झाला नाही. उशिरा आलेला पाऊस पुरेसा नसल्याचा फटका हळद लागवडीवर झाला. त्यातच हळदीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीचे धाडस केले नाही. यंदा हळदीची लागवड साधारणपणे २ लाख १० हजार हेक्टरवर झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे १ लाख ५० हजार हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.

हळद वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने देशात ५ ते ८ टक्क्यांनी हळदीचे उत्पादन घट होण्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. देशात दरवर्षी हळदीच्या क्षेत्रात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे हळदीच्या दरात चढ उतार होते. त्यानुसार शेतकरी हळद विक्रीचे नियोजन करत असतो.

गत हंगामात हळदीला चांगले दर मिळतील या आशेवर शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. गतहंगामात ३ लाख ४९ हजार ६४२ हेक्टर झाली होती. गेल्या वर्षी सुमारे ४९ हजार हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हळदीच्या वाढत्या उत्पादनामुळे हळदीचे दरात वाढ झाली नाही. त्याचा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

Turmeric
Turmeric Rate : ऐन सणासुदीत हळदीच्या बाजारावर दबाव; भाव काय राहतील?

यंदा देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. त्यातच मॉन्सूनचा पाऊस वेळेवर सुरू झाला नाही. त्यामुळे हळद लागवडीसाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. परंतु ज्या भागात शाश्‍वत पाण्याची सुविधा आहे, त्या ठिकाणी हळद लागवड केली. परंतु पावसाच्या दडीमुळे हळद लागवड खोळंबली होती. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली.

मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर नाही, पुरेसा पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे धाडस केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा देशात २ लाख १० हजार हेक्टरवर लागवड झाली असून, गतवर्षीपेक्षा यंदा १ लाख ५० हजार हेक्टरने क्षेत्रात घट असल्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

हळद लागवड करून साडे सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. हळकुंड वाढीचा काळ सुरू आहे. परंतु देशात अनेक भागांत पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे वाढीच्या काळात पाण्याची कमतरता असल्याने हळकुंड अपेक्षित वाढ होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे उत्पादनात ५ ते ८ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. पाणी कमी पडत असल्याने हळकुंडाची लांबी, जाडी आणि कुरकुमीनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Turmeric
Turmeric Sowing : हळदीच्या क्षेत्रात दहा हजारांवर हेक्टरने घट

हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव

सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. या बदला फटका हळद पिकावर बसू लागला असून करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात ८ ते १० टक्के करपा, बुरशीजन्य रोग हळदीवर असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी राज्यात १ लाख १० हजार हेक्टर लागवड झाली होती. हळद लागवडीच्या काळात पाऊस नाही. त्यामुळे बियाणांची विक्रीही कमी झाली. पावसाच्या दडीचा परिणाम हळद लागवडीवर झाला.

यंदाच्या हंगामात ६५ हजार हेक्टरवर लागवड झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५ हजार हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे. देशातील हळदीचे अंतिम लागवडीचे क्षेत्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निश्‍चित होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली हंगामापुढील प्रश्‍न... * पाण्याची टंचाई भासणार. * दर्जेदार हळदीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता. * तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात सध्या पाण्याची टंचाई नाही.

देशातील हळदीचे क्षेत्र घटण्याची मुख्य दोन कारणे आहेत. पहिले कारण देशात यंदा वेळेवर पाऊस सुरू झाला नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर नाहीत, हे दुसरे कारण आहे. यामुळे देशातील हळदीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे हळदीच्या उत्पादनात घटीची शक्यता आहे.
- डॉ. मनोज माळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com