
Akola News : आधारभूत किमतीने तूर खरेदी व नोंदणी प्रक्रियेचे आदेश शासनाने गेल्या काळात दिलेले आहेत. मात्र, अनेक केंद्रांवर सोयाबीनची आवराआवरच अद्याप पूर्णत्वास न गेल्याने तूर खरेदीचा मुहूर्त रखडलेला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी तूर खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदाच्या हंगामातील तूर खरेदीसाठी २४ जानेवारीपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तर १३ फेब्रुवारीपासून पुढील ९० दिवस तूर खरेदी करण्याची घोषणाही झालेली आहे. प्रत्यक्षात आता २० ते २५ दिवस लोटले तरी आधारभूत किमतीने सार्वत्रिक ठिकाणी तूर खरेदी सुरू झालेली नाही.
अनेक केंद्रांवर खरेदी केलेले सोयाबीन गोदामात डिपॉझिट होण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस रखडत गेली. अशातच तूर खरेदीचे निर्देश देण्यात आले. दरम्यानच्या काळात खरेदीच्या उद्देशाने जिल्ह्याची तुरीची उत्पादकताही शासनाने जाहीर केली व खरेदीचे उद्दिष्टसुद्धा दिले. त्यामुळे तूर खरेदीच्या प्रक्रियेत कुठलाही अडथळा येणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटत होते.
या वर्षात तुरीला ७५५० रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केलेला आहे. पण तूर खरेदी प्रक्रियेला अनेक ठिकाणी सुरुवात झालेली नसल्याने तूर उत्पादक शेतकरी संभ्रमात पडले आहेत. खुल्या बाजारात तुरीचा दर सरासरी सात हजारांपर्यंत मिळतो आहे. किमान दर तर हमीभावापेक्षा हजार रुपयांनी म्हणजेच ६५०० रुपये एवढा आहे.
कमाल दर ७६०० असला तरी सर्वच मालाला हा भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासकीय तूर खरेदी सुरू झाल्यास खुल्या बाजारातील दर टिकून राहण्यास मदत होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. काही केंद्र चालकांनी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना संदेश सोडल्याचे सांगितले. मात्र, अद्याप मालाची आवक सुरू नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
सोयाबीनने आणले मेटाकुटीस
शासकीय दराने राज्यात यंदा सोयाबीनची एक कोटी १२ लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदी झाली. खरेदी झालेली ही सोयाबीन ठेवण्यासाठी गोदामात जागा शिल्लक नव्हती. सहा फेब्रुवारीला सोयाबीन खरेदी थांबवल्यानंतरसुद्धा महिनाभर अनेक केंद्रांचा माल पडून होता. अद्याप सोयाबीन साठवणुकीची प्रक्रिया सुरूच आहे.
काही शेतकरी कंपन्या यावर्षी खरेदी प्रक्रियेत होत्या. त्यांना खरेदी केलेले सोयाबीन शासनाकडे गोदामात डिपॉझिट करायला १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागली. या काळात माल घेऊन गेलेल्या वाहनाचे प्रत्येक दिवसासाठी भाडे वाढत गेले. या ‘खुटी’चा फटका सहन करावा लागला. सोयाबीनच्या प्रक्रियेचा संपूर्णपणे केंद्राबाहेर निघाल्यानंतरच आता तूर खरेदीचे बघू अशी भूमिका या केंद्रचालकांनी स्वीकारल्याचे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.