
जेजुरी, जि. पुणे : सासवड तालुक्यातील जेजुरी येथे सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार (Donkey Market) बुधवार (ता. ४) पासून भरला आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत आहे.
बाजारात ६०० गावठी (Desi Donkey) व राजस्थानी काठेवाडी जातीच्या ४०० गाढवांची खरेदी-विक्री झाली. जनावरे कमी आणि व्यापारी जास्त यामुळे जनावरांना मोठी मागणी राहिल्याने चढ्या भावात विक्री होत होती. यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली.
जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी विक्री) पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. तीन ते चार दिवस दिवस हा बाजार चालतो. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी विक्री करतात.
या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यांसह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातीच्या गाढवासह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी विक्री बरोबरच देवदर्शन कुलधर्म कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.
यंदा एक हजाराच्या आसपास विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषतः राजस्थानी- काठेवाडी जातीची ७५ जनावरे होती. या गाढवाला सर्वात जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर गावरान गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागली.
राजस्थानी काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते. पूर्वीच्या काळी गारुडी, कुंभार, परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत असे, आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी-विक्री करताना दिसतात. गेल्या वर्षी एक हजार गाढवांची संख्या होती, यावर्षी ही संख्या निम्म्याने कमी झाली आहे.
प्रतिवारीनुसार दर आकारले जातात
दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात. रंगावरूनही किमत करण्यात येते. पांढऱ्या शुभ्र जनावराला चांगला दर मिळतो, त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.