
औरंगाबाद : कापसाचे दर (Cotton Rate) वाढल्याचा गवगवा झाला. परंतु उत्पादनात (Cotton Production) मोठी घट येत असल्याने मराठवाड्यातील कापूस उत्पादकांच्या (Cotton Farmer) पदरी यंदा क्षेत्र वाढ होऊनही, फार काही पडेल अशी स्थिती नाही. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार भागनिहाय २५ ते ४० टक्क्यांपर्यंत आताच उत्पादनात घट दिसत असून दोन ते तीन वेचण्यात कपाशीची उलंगवाडी होणार हे स्पष्ट आहे.
अतिपाऊस, मूळ कूज, बोंडसड, बोंडअळी आदी कारणांनी कपाशीची दोन ते तीन वेचण्यात उलंगवाडी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. उत्पादनातही भागनिहाय २५ ते ४० टक्क्यांपर्यंत येत असलेली घट काही भागात ५० टक्क्यांच्या पुढे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अतिपाऊस, मोठा खंड आणि पुन्हा अतिपाऊस या तिहेरी आक्रमणात शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याची वाताहत झाली. सुरुवातीला असलेले दरही घसरल्याने उत्पादन घटलेले असताना कपाशी पिकातून फार अर्थकारण सुधारेल अशी स्थिती नसल्याचे शेतकरी सांगतात.
कापूस उत्पादकता घटीची कारणे...
- प्रारंभी व शेवटच्या टप्प्यात अतिपाऊस, मध्यंतरीचा मोठा खंड
- बोंड सडीत वाढ, बोंडअळी, आकस्मिक मरचे प्रमाण नियंत्रणाबाहेर
- विकृती वाढल्याने पीक लाल पडून पानगळ
- सततच्या पावसाने अनियंत्रित तण
दृष्टिक्षेपात मराठवाड्यात यंदा कपाशी...
- सर्वसाधारण क्षेत्र : ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर
- प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र : ४८ लाख ३० हजार ३८५ हेक्टर
- उस्मानाबाद जिल्हा वगळता एकाही जिल्ह्यात सरासरी क्षेत्राइतकी पेरणी नाही
- पेरणी क्षेत्रापैकी ५१.५० टक्के सोयाबीन, तर २८.३९ टक्के कपाशी
- गतवर्षी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २६.८३ टक्के, अर्थात १२ लाख ८५ हजार २९० हेक्टरवर लागवड
- यंदा या क्षेत्रात सुमारे ३ टक्के वाढ, होऊन १३ लाख ७१ हजार ४९३ पेरणी
- यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २८.३९ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड - प्रमुख कापूस उत्पादक जिल्हे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड
वेचणीचे दरही वाढले, मजूर मिळेना
यंदा कापूस वेचणीला सुरुवातीलाच शेतकऱ्यांना १० रुपये प्रति किलो दर मोजावा लागत आहे. याशिवाय कापूस वेचणीसाठी लागणारे मजूरही मिळत नसल्याने इतर गावावरून वाहनाने मजूर आणून फुटलेला कापूस वेचण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागते आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक भुर्दंडामुळे कापूस वेचणीचे प्रति किलो दर १२ ते १५ रुपयांपर्यंत जात असल्याचे शेतकरी सांगतात. एवढं करूनही काही भागात मजूरच मिळत नसल्याने वेचणी अभावी कापूस शेतातच असल्याची स्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.