Sugar Production India: पुढील हंगामापर्यंत साखर टंचाई भासणार नाही

Sugar Stock 2025: साखर उत्पादनात घट असूनही यंदा देशात साखरेची टंचाई भासणार नाही, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने व्यक्त केला आहे. पुढील वर्षी उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित असून ऊस लागवडीतही वाढ झाली आहे.
Sugar Production
Sugar Production Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News: देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटण्याच्या पार्श्वभूमीवरही पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा ४९ लाख टन इतका राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ या महिन्यांत देशाअंतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.

यंदाच्या हंगामात २६१ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर उत्पादन कमी असले तरी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत देशात साखरेची टंचाई भासणार नाही, असा विश्वास साखर महासंघाने व्यक्त केला आहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी हा साठा पुरेसा होवू शकतो.

तिन्ही राज्यांनी बिघडविले उत्पन्नाचे गणित

देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक ही राज्ये देशात ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. या राज्यांच्या उत्पादनावरच देशातील साखरेचे गणित अवलंबून असते. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे या राज्यात लागवडीत घट झाली. तसेच महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये हंगामाच्या प्रारंभीच मोठा पाऊस सलग झाल्याने पाणी साचून राहिल्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. लागवडी कमी झाल्याने घट अपेक्षित असली तरी परतीच्या पावसाने सुमारे वीस टक्क्यांपर्यंत साखर उत्पादनात घट केली.

Sugar Production
Sugar Industry: साखर उद्योगाची दिशा ठरविण्यासाठी समिती स्थापन

यामुळे केंद्राने सुरुवातीपासून विक्री कोटे नियंत्रित करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामाच विक्री कोटे कमी देऊन कमी साखर उत्पादन, बाजारात मागणी या बाबत संतुलन राखले. यामुळे उत्पादन कमी होऊनही साखरेची टंचाई सध्या देशात नसल्याचे चित्र आहे. सध्या एक्स मिल साखरेच्या किमती ३,८८० ते ३,९२० प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिर आहेत.

पुढील वर्षी ३५० लाख टन उत्पादनाची अपेक्षा

यंदा साखर उत्पादनाने निराशा केली असली तरी पुढील हंगाम मात्र साखर उत्पादन वाढीच्या दृष्टीने चांगला जाईल, असा अंदाज आहे. पुढील वर्षी तब्बल ३५० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होवू शकतो. ऊस उत्पादक राज्यांमध्ये यंदा ऊस लागवडी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादन वाढीवर होवू शकतो.

कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीत आखडता हात

२०२२-२३ या साखर वर्षात साखर उद्योगाने ४३ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली आणि त्यातून ३६९ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. २०२३-२४ या वर्षांत साखरेच्या कच्च्या मालापासून करण्यात आलेल्या इथेनॉलचा पुरवठा २७० कोटी लिटर इतका झाला. ही घसरण २०२४-२५ या वर्षी ही चालू राहीली. या वर्षात इथेनॉलचा पुरवठा २५० कोटी लिटर इतका होईल, असा अंदाज आहे. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ होणे पण त्या प्रमाणात इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढ न होणे, हे आहे. इथेनॉल उत्पादनात फायदा होत नसल्याचे लक्षात आल्याने कारखान्यांनीही हात आखडता घेतला.

Sugar Production
Sugar Quota: केंद्राची सावध पावले; जूनचा साखर कोटा अडीच लाख टनांनी घटविला

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण पोहोचले १८.६१ टक्क्यांवर

राष्ट्रीय जैव इंधन-२०१८ या धोरणाअंतर्गत दरवर्षी ६० ते ७० लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले. या धोरणामुळे भारताची इथेनॉल उत्पादनाची क्षमताही वाढली आहे. २०१८ मध्ये ती ५१८ कोटी लिटर होती, तर २०२५ मध्ये ती १,८०० कोटी लिटर इतकी झाली. तिचे पेट्रोलमध्ये मिश्रणाचे प्रमाण २०१८ मध्ये ४.२२ टक्के इतके होते ते ३० एप्रिल २०२५ मध्ये १८.६१ टक्के इतके झाले आहे.

इथेनॉलला दर नसल्याने निर्मितीतही घट

यंदाचा हंगामात (२०२४-२५) ४० लाख टन साखर इथेनॉलमध्ये वळवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२ लाख टन वळविली जाण्याची शक्यता आहे. हे प्रमाण कमी होण्याचे कारण म्हणजे इथेनॉलला मिळणारी किंमत आणि देशाअंतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या साखरेला मिळत असलेले भाव यातील तफावत हे होय. परिणामतः देशाची इथेनॉल उत्पादनाची क्षमता प्रति वर्षी ९५२ कोटी लिटर असून व त्यात मल्टिफीड डिस्टिलरीजतून उत्पादन होणाऱ्या १३० कोटी लिटरचा समावेश आहे.

इथेनॉल क्षेत्रासमोरील वाढत्या आव्हानांचा विचार करण्यासाठी पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक नुकतीच झाली. या बैठकीत साखर उद्योगाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व आय.एफ.जी.ई. च्या साखर-बायो एनर्जी ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या बोर्डाचे तज्ज्ञ संचालक रवी गुप्ता यांनी केले. या प्रतिनिधी मंडळात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, सुबोध कुमार आशिष कुमार, तुषार पाटील यांचा समवेश होता. त्यांनी संयुक्तपणे या क्षेत्राशी संबंधित समस्या आणि त्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजना याचा रोडमॅप सादर केला. त्यानुसार त्यांनी सुचविलेले उपाय याप्रमाणे आहेत.

उच्चस्तरीय बैठकीत सुचविलेले उपाय

- ऊस, मका आणि तांदूळ या सारख्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन इथेनॉलच्या खरेदी किमतीत सुधारणा करण्यात यावी.

-२०३५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य स्पष्ट, टप्प्याटप्याने २० टक्क्यांहून अधिक वाढवावे.

- इथेनॉलची मागणी वाढविण्यासाठी आणि उच्च मिश्रणासाठी बाजारपेठेतील तयारी निश्चित करण्यासाठी फ्लेक्स-फ्यूएल व्हेइकल्स (एफ. एफ. व्ही)ला प्रोत्साहन देण्यात यावा आणि त्याच्या उत्पादनाला चालना मिळावी.याशिवाय इंधनात इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी भविष्यात डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात यावा.

अनुकूल मॉन्सून परिस्थिती आणि महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या प्रमुख उत्पादक राज्यांत वाढलेल्या उसाच्या लागवडीनंतर अपेक्षा वाढल्या आहेत. त्या सोबतच यंदा केंद्र शासनाने उसाची वाढीव एफआरपी वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढलेला आहे. यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन वाढीची अपेक्षा आहे.
हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com