Ginger Market : सरसकट आले खरेदीवर स्वाभिमानी संघटना ठाम

Ginger Procurement : सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये यावर्षी पुन्हा एकदा आले खरेदीदारांनी नवे जुने प्रतवारीनुसार आले खरेदी करण्याचा फसवा ट्रेंड सुरू केला आहे.
Ginger Rate
Ginger Rate Agrowon

Satara News : सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये यावर्षी पुन्हा एकदा आले खरेदीदारांनी नवे जुने प्रतवारीनुसार आले खरेदी करण्याचा फसवा ट्रेंड सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आले उत्पादकांची वाठार किरोलीमध्ये येल्गार परिषद शनिवारी (ता. १) घेण्यात आली. या बैठकीत सरसकट आले खरेदी करण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

आल्याचे गुणधर्म नव्या आणि जुन्या आल्यात कायम असतात. बाजारपेठेतील अंतिम ग्राहकाला नव्या जुन्याशी काही देणे घेणे नाही. मात्र काही बडे भांडवलदार व्यापारी काही तकलादू कारणे देत बंद पडलेली पद्धत पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा हा प्रकार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.

Ginger Rate
Ginger Farming : विक्रमी आले उत्पादनातील अमोल

त्यामुळे ही पद्धत पुन्हा एकदा बंद पाडण्यासाठी संघटितपणे आक्रमक लढा उभारणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी जाहीर केला. गेल्या वर्षीपासून आले पिकाला चांगले दर मिळू लागताच पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर नव्या जुन्या आले प्रतवारी भूत व्यापाऱ्यांनी बसवले आहे, ते उतरवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा निर्धार प्रगतिशील आले उत्पादक आशिष घार्गे, प्रवीण बर्गे, सूर्यकांत पवार,हणमंत जगदाळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर, कर्नाटक पट्ट्यातील आलेबरोबर बाजारपेठेत सातारी आल्याला स्पर्धा करावी लागत आहे. मात्र सातारा आल्याची अंगभूत गुणधर्मामुळे बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे वाढत्या स्पर्धेतही सातारी आल्याची मागणी कायम आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी सौदे मिक्स घ्यावेत,आणि शेतकऱ्यांनीही मिक्स सौदे करावे, अशी भूमिका कृषिभूषण मनोहर साळुंखे यांनी मांडली.

जुने आणि नवीन मालाची प्रतवारी करून चांगल्या मालाला कवडीमोल दर देणे सुरू केल्याने दोन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आले उत्पादकाच्या असंतोषाचा उद्रेक होतो आहे. व्यापारी आमचे शत्रू नाहीत, त्यांनीही विविध मार्केट मधील आडतदारांच्या दबावाला बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, यंदा हा संघर्ष होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र व्यापारी ऐकणार नसतील तर गेल्या वर्षीपेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल, अशी आमची भूमिका असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि तानाजी देशमुख यांनी सांगितले.

Ginger Rate
Ginger Cultivation : आल्याच्या लागवडीस गती

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बाजार समितीमधील परवाना काढावा, त्याशिवाय व्यापार करू नये, पाऊस सुरू झाल्यानंतर हवामानात बदल होणार असल्याने आले पिकाचे सौदे मिक्सच करावेत, आले माल खरेदी करताना सौदा पट्टी शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांनीही स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच माल द्यावा, आणि प्रतवारी केलेले सौदे सापडले तर माल जप्त केला जाईल, असे ठरावही या वेळी करण्यात आले. या ठरावाची प्रत व्यापारी संघटना, पणन कार्यालय, जिल्हा मार्केट कमिटी, पुणे मार्केट कमिटीला पाठवण्यात येणार आहे.

या वेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अंगापुरचे जितेंद्र कणसे आणि जयपूरचे राहुल निकम यांनी संघटनेच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंढरीनाथ गायकवाड, किरण साळुंखे, तानाजी पाटील, नीलेश गायकवाड, प्रेमनाथ खामकर, चंद्रकांत घोरपडे, नवनाथ गायकवाड श्रीधर पिंगळे यांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com