
Pune News : तेल विपणन कंपन्यांना राज्यातून आतापर्यंत ७५ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा झालेला आहे. मात्र इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढत असताना साठवणुकीची समस्या तयार झालेली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना मळीसारख्याच इथेनॉल साठवणुकीच्या स्वतंत्र टाक्या उभारण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
तेल विपणन कंपन्यांनी चालू इथेनॉल वर्षासाठी १३२ कोटी लिटर पुरवठ्याचे उद्दिष्ट राज्याला दिलेले आहे. साखर कारखान्यांच्या सध्याच्या पुरवठा तयारीपेक्षाही उद्दिष्ट जास्त आहे. त्यामुळे राज्यात तयार झालेले सर्व इथेनॉल विकण्याची हमी आहे. परंतु तयार झालेले इथेनॉल त्वरित विकले जाणार नाही, हे स्पष्ट होते आहे.
कारखान्यांमधून इथेनॉल घेऊन निघालेले टॅंकर पुढे तेल कंपन्यांच्या आगारात जातात. मात्र तेथे लांबलचक रांगेत अनिश्चित कालावधीपर्यंत टॅंकर उभे करावे लागतात. त्यामुळे इकडे कारखान्यात तयार झालेले इथेनॉल घेऊन जाण्यासाठी पर्यायी टॅंकर नाहीत. तसेच टॅंकर नसल्यास साठवणुकीच्या टाक्याही उपलब्ध नाहीत. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पांचे पुरवठा नियोजन विस्कळीत होते आहे.
“राज्यात तयार झालेले इथेनॉल तत्काळ विकत घेत साठवणूक करण्याची क्षमता तेल कंपन्यांकडे नाही. कंपन्यांकडे साठवणुकीच्या पुरेशा टाक्या नाहीत. त्यामुळेच कारखान्यांचे इथेनॉल उत्पादन व पुरवठा नियोजन कोलमडून पडते आहे.
परंतु तूर्त कारखान्यांनाच पुढाकार घेत या समस्येवर तोडगा काढावा लागेल. त्यासाठी इथेनॉल प्रकल्पाशेजारी उच्च क्षमतेच्या इथेनॉल साठवण टाक्या उभाराव्यात लागतील. मळी साठवणुकीची समस्या कारखान्यांनी याच प्रकारे सोडविलेली आहे,” अशी माहिती आयुक्तालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
येत्या ३१ ऑक्टोबरला इथेनॉल वर्ष संपत आहे. तोपर्यंत अजून ५७ कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याची संधी कारखान्यांकडे आहे. तथापि, गाळप हंगाम समाप्त झाल्यामुळे इथेनॉल निर्मिती संथ झालेली आहे.
गाळप हंगाम सुरू असतानाच ऊस रस व पाकापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार होते. यंदा हंगामात असे ४५ कोटी लिटर इथेनॉल तयार होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात निर्मिती ३६ कोटी लिटर इतकी झालेली आहे.
“यंदा ऊसगाळप हंगाम लवकर संपला. कारखान्यांची गाळपक्षमता वाढलेली असल्यामुळे पुरेसा ऊस मिळाला नाही. त्यामुळे ऊस रस व पाकापासून अपेक्षेपेक्षा कमी इथेनॉल तयार झाले आहे. बी-हेव्ही श्रेणीत ८५ कोटी लिटर इथेनॉल अपेक्षित आहे.
आतापर्यंत ते ३७ कोटी लिटर तयार झालेले आहे. या श्रेणीत अजून चांगल्या प्रमाणात इथेनॉल तयार होण्यास वाव आहे. अजून पाच महिने हाती आहेत. त्यामुळे राज्यातील इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडून पुरवठा उद्दिष्टाच्या किमान ९० टक्क्यांपर्यंत तरी निर्मिती होणे शक्य आहे,” असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे.
विक्रीची अडचण नाही
केंद्र शासनाने आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत नेले आहे. हेच प्रमाण पुढील कालावधीत २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केंद्राचे आहे. त्यामुळे राज्यात कितीही इथेनॉल तयार झाले, तरी विक्रीबाबत अडचण येण्याची शक्यता नाही. मात्र तयार झालेले इथेनॉल साठविण्यासाठी कारखान्यांना स्वतःची साठवण क्षमता वेगाने विकसित करावी लागेल. अन्यथा, पुरवठ्याची समस्या आणखी वाढू शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
थोडक्यात महत्त्वाचे...
- तेल विपणन कंपन्यांकडून राज्याला चालू वर्षासाठी १३२ कोटी लिटर पुरवठ्याचे उद्दिष्ट
- इथेनॉल प्रकल्पांचे पुरवठा नियोजन विस्कळीत
- स्वतंत्र टाक्या उभारण्याचा पर्याय
- येत्या ३१ ऑक्टोबरला इथेनॉल वर्ष संपणार
- तोपर्यंत अजून ५७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याची कारखान्यांना संधी
राज्यातील इथेनॉल निर्मितीची स्थिती
पुरवठादार स्रोत-प्रकल्पांची संख्या-आतापर्यंत झालेला पुरवठा
सहकारी प्रकल्प-३४-२३.५० कोटी लिटर
खासगी प्रकल्प -३९-४७ कोटी लिटर
एकल प्रकल्प-९-४.४० कोटी लिटर
(ही आकडेवारी डिसेंबर २०२२ पासून ते मे २०२३ पर्यंतची आहे.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.