राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन सेवा
Ethanol Production : कोल्हापूर ः पेट्रोलमध्ये इथेनॉलचे जास्तीत जास्त मिश्रण करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच आता डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण (Ethanol Mixed Diesel) करण्यासाठी तेल कंपन्या सरसावत आहेत.
बीपीसीएल व इंडियन ऑइल या कंपन्यांनी वाहन व इंजिन बनविणाऱ्या कंपन्यांशी करार करून तांत्रिक बाबींसाठी देवाणघेवाण सुरु केली आहे.
केंद्राने आतापर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर अधिक भर दिला. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रणही वाढले.
आता तेल कंपन्यांनी पुढाकार घेत इथेनॉल मिश्रित डिझेलसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
इंधन उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीपीसीएल’ने सात टक्के इथेनॉलचे डिझेलमध्ये मिश्रण करण्यासाठी अशोक लेलॅंड या अवजड वाहने तयार करणाऱ्या कंपनीबरोबर प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु केले आहे.
इंडियन ऑइलने इंजिन बनविणाऱ्या दोन कंपन्यांबरोबर पाच टक्के इथेनॉल मिश्रणाबाबत काम केले आहे.
याच बरोबर ‘बीपीसीएल’ने दुचाकी कंपनी बरोबर काम सुरु करताना २७ टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल व ८५ टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल यावरही काम सुरु केले आहे.
नवे इंधन वाहनांमध्ये वापरण्यात यश
‘बीपीसीएल’च्या सूत्रांनी सांगितले की, अशोक लेलॅंड कंपनीने आपल्या वाहनांमध्ये ९३ टक्के डिझेल व ७ टक्के इथेनॉल मिश्रण असलेले नवे इंधन वापरले आहे.
या मध्ये कंपनीला यशही मिळाले आहे. कंपनीने केवळ एवढाच प्रयोग न करता या इथेनॉल मिश्रित डिझेलमधून प्रदूषण किती कमी होते, या बाबतीतही चाचपणी केली.
हा प्रयोग करण्यासाठी मोठी वाहने वापरली. इथेनॉल मिश्रित डिझेलमधून प्रदूषणाच्या पातळीतही घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे...
- प्रयोग सफल होत असल्याने आता या प्रयोगाचा प्रस्ताव सरकार दरबारी मांडण्यासाठी बीपीसीएल कंपनीचे प्रयत्न सुरु
- या इंधनाला ‘इंडी ७’ असे नाव देणार
- या इंधनाची बाजारात विक्री करण्यासाठी परवानगी सरकारकडे मागण्यात येणार
- सरकारने इंधन विक्रीची परवानगी दिल्यास प्रदूषणात होणार घट. देशाचे परकीय चलनही वाचणार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.