

Akola News: राज्य शासनाने एक एप्रिलपासून हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नोंदणीला गुरुवार (ता. २७)पासून सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरभरा उत्पादकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून, योग्य दर मिळविण्यास मदत होईल. या हंगामात सात लाख ८९४८ टन हरभरा खरेदीचा राज्याला लक्ष्यांक देण्यात आला आहे. विविध एजन्सीच्या केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
यंदाच्या हंगामात हरभऱ्याची राज्यभरात विक्रमी लागवड झालेली आहे. सरासरी २१.५२ लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे २८.४० हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली होती. या वर्षी हरभऱ्याची उत्पादकताही बऱ्यापैकी असल्याने जानेवारीपासूनच बाजारात हरभऱ्याची आवक सर्वत्र वधारत गेली. आता हंगामात अंतिम चरणात पोचलेला आहे. मध्यंतरी बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याची बाजार समित्या, खेडा खरेदीत विक्री केलेली आहे. तरी अद्याप मोठ्या प्रमाणात हरभरा विक्री शिल्लक आहे. अशा स्थितीत या मालाला हमीभावाने विक्री करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे.
सध्या बाजारात हरभऱ्याची खरेदी विक्री हमीभावाच्या (५६५०) आतच आहे. साडेचार हजारांपासून किमान दर मिळत आहे. कमाल दर ५५०० पर्यंत आहे. किमानदर व हमीभावात सुमारे हजार रुपयांपेक्षा अधिक तफावत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना हरभऱ्याला दर मिळण्यास या खरेदी प्रक्रियेचा निश्चितच फायदा होऊ शकेल.
खरेदी प्रक्रियेस विलंब
या वर्षात हमीभावाने सोयाबीनची पहिल्यांदाच बंपर खरेदी झाली. सोयाबीनची आवराआवर करण्यात बराच वेळ गेला. त्यानंतर लगेच तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकाचवेळी खरेदी केंद्रावर गोंधळाची स्थिती होऊ नये या हेतूने मार्चच्या मध्यात सुरू होणारी हरभरा खरेदी यंदा एक एप्रिलपासून सुरू होत आहे. या खरेदी प्रक्रियेअंतर्गत नोंदणी व प्रत्यक्ष माल खरेदीला किती प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल. बाजारात दर कमी असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर माल विक्रीला आणतील, असा अंदाज यंत्रणेतील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
- हरभऱ्याचा हमीभाव ५६५० रुपये क्विंटल
- सध्याचे दर- किमान ४७००, कमाल ५५५०, सरासरी ५२०० रुपये
- खरेदीचा लक्ष्यांक ः सुमारे ७ लाख ८९४८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.