
अमरावती : दिवाळीतही सोयाबीनच्या हंगामावरील (Soybean Season) पावसाचे सावट कायम आहे. नवीन सोयाबीनची खुल्या बाजारातील (Soybean Market) आवक अजूनही नगण्य असून सध्या बाजारात नऊ ते दहा हजार पोत्यांची आवक (Soybean Arrival) आहे. पाच हजार रुपयांपेक्षाही कमी भाव मिळू लागले आहेत. दिवाळीनंतर हंगामास गती येणार असल्याचे व भाव सरकारच्या धोरणांवर सोयाबीनचे भाव (Soybean Rate)अवलंबून असल्याचे मत खरेदीदारांचे आहे.
यंदाच्या खरिपात अतिवृष्टी व सततच्या पावसासोबतच परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. ७८ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी वर्तविला आहे. काही शेतकऱ्यांकडे अजूनही जुना सोयाबीन शिल्लक असल्याने त्यांनी तो आता बाजारात आणला आहे. येथील बाजार समितीत सोमवारी (ता. १७) जुन्या सोयाबीनची ९ हजार, तर मंगळवारी (ता. १८) नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाला. ७०१० पोत्यांची आवक झाली असून, त्यांना ४००० ते ४९०० रुपये भाव प्रति क्विंटलला मिळाला.
ऐन कापणी व मळणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून ठेवला तरी त्याची मळणी करण्यासाठी पावसामुळे विलंब होऊ लागला आहे. नव्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने बाजारात खरेदीदारांनी भाव वाढविलेले नाहीत. गतवर्षी १० हजार रुपयांवर भाव चढले व सात हजार रुपयांपर्यंत ते बराच काळ स्थिर राहिले आहेत. या वर्षी पावसामुळे झालेले नुकसान व आद्र्रता बघता भाव पाच हजार रुपयांवर राहण्याचा अंदाज खरेदीदारांनी वर्तविला आहे.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या हंगामास गती येणार असल्याचे भाकीत असून भाव वाढणे सरकारच्या आयात धोरणावर अवलंबून असल्याचे खरेदीदारांनी म्हटले आहे. केंद्राने या वर्षी आयात शुल्कात वाढ केल्यास स्थानिक बाजारपेठेत भाव वधारण्याची संधी राहणार आहे. मात्र देशभरात सोयाबीनचे झालेले नुकसान व उत्पादनाची घसरलेली सरासरी बघता आलेली कमी भरून काढण्याकरिता सोयापेंडच्या आयातीची शक्यता अधिक आहे. त्याचा एकूणच परिणाम स्थानिक बाजारपेठेवर पडणार आहे.
सध्या पावसामुळे सोयाबीनची आवक कमी आहे. भावही तुलनेने कमीच आहे. दिवाळीनंतर पाऊस पूर्णतः उघडण्याची शक्यता असून, आवक वाढेल. केंद्र सरकार आयात धोरण कसे जाहीर करते यावर सोयाबीनचे स्थानिक भाव अवलबूंन आहेत. दिवाळीनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.
- राजेश पाटील, खरेदीदार, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.