Soybean Rate : सोयाबीन जैसे थे; तुरीतील मंदी तात्पुरती

Edible Oil : नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेलाचा महापूर आला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या पामतेल सोयातेलापेक्षा प्रतिटन १४० डॉलर्स आणि सूर्यफूल तेलापेक्षा १०० डॉलर्स अधिक असल्याने चालू महिन्यात अशुद्ध आणि रिफाइंड पामोलिनची आयात अर्धी किंवा त्याहूनही कमी राहील असे आयातदारांचे म्हणणे आहे.
Tur Soybean
Tur Soybean Agrowon
Published on
Updated on

Soybean Market Update : नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या २०२४-२५ या खाद्यतेल वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आयातीमध्ये ३९ टक्के एवढी जोरदार वाढ झाली असल्याचे खाद्यतेल उद्योगाची शीर्षसंस्था सॉल्वेन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (SEA) म्हटले आहे.

जागतिक बाजारात अलीकडील काळात पामतेल हे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले आहे. त्यामुळे अर्थातच पाम तेलाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असलेल्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात बरीच वाढली आहे.

ही गोष्ट देशातील नागरिकांच्या दृष्टीने किंचित सकारात्मक आहे. परंतु सोयाबीन आणि मोहरी यांच्या देशांतर्गत बाजारात गडगडलेल्या किमती पाहता दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेलाचा महापूर आला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या पाम तेल सोयातेलापेक्षा प्रतिटन १४० डॉलर्स आणि सूर्यफूल तेलापेक्षा १०० डॉलर्स अधिक असल्याने चालू महिन्यात अशुद्ध आणि रिफाइंड पामोलिनची आयात अर्धी किंवा त्याहूनही कमी राहील असे आयातदारांचे म्हणणे आहे.

तसेच देशांतर्गत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. या दोन गोष्टींचा प्रभाव पडून बाजारात किंचित सुधारणा होऊ शकेल.

परंतु सोयाबीनचे भाव मुख्यत: अमेरिकी खंडातील परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यादृष्टीने पाहता येत्या वर्षात ब्राझील आणि अर्जेंटिनामधील उत्पादन कोणत्याही कारणाने घटण्याचे दृढ संकेत मिळत नाहीत तोपर्यंत माफक तेजी येणे शक्य दिसत नाही.

Tur Soybean
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीची घोषणा; मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत त्रुटी

सध्या तरी त्यादृष्टीने कोणतीच घटना ऐकायला मिळत नसली तरी एका संस्थेने नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये दक्षिण अमेरिकेत कमी क्षमता आणि कालावधीचा ला-नीना उद्भव होईल असे म्हटले आहे. ला-नीना मुळे दक्षिण अमेरिकेत पावसाचे प्रमाण खूप कमी होते हा अनुभव पाहता या गोष्टीचा सोयाबीन उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होईल असे आडाखे बांधले जाऊ शकतात. परंतु ही अजूनही जर-तर ची गोष्ट असली तर यावर लक्ष ठेवून राहायला हवे.

आपल्याकडे घाऊक बाजारात सोयाबीन ४० रुपये किलो विकले जात असताना ‘डी-मार्ट’ या सामान्य लोकांमध्ये स्वस्त वस्तूंसाठी अत्यंत लोकप्रिय झालेल्या किरकोळ साखळी दुकानात तेच सोयाबीन फक्त छान स्वच्छ करून आकर्षक प्लॅस्टिक वेष्टनात भरून प्रतिकिलो १४० रुपये दराने विकले जात आहे.

सोयाबीनचा किरकोळ बाजार अजून फार मोठा नसला तरी सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण कल्पना महत्त्वाच्या ठरतात. सोयाबीन पासून टेंपेह (Tempeh) प्रोटीन चिप्स बनविणारी ५० हजार कोटी रुपयांची आणि सतत वाढत जाणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असून, अशा प्रकारच्या पौष्टिक खाद्यपदार्थांना भारतात मागणी वाढत आहे.

पशुखाद्य क्षेत्रात आव्हाने निर्माण होत असताना मानवी अन्न क्षेत्रात अधिक संधी शोधल्यास आपल्याला पेंड निर्यातीवरील अवलंबित्व कमी करण्यास काही प्रमाणात का होईना मदत होईल.

मक्यातील बदलते समीकरण

मागील वर्षभर मका तेजीत राहिला आहे. त्यामुळेच सरत्या खरीप हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आणि सर्वसाधारण हवामानामुळे उत्पादनही त्याच प्रमाणात वाढले. तरीही चांगल्या दर्जाचा मका इतर कृषिमालाप्रमाणे हमीभावाच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले नाही. याचे कारण पुरवठ्यामधील अपेक्षित वाढीपेक्षा मागणीतील वाढ अधिक राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

मक्याच्या मागणीतील ही वाढ प्रामुख्याने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनच आहे. केंद्र सरकार पुढील दोन वर्षांत किंवा त्यापूर्वीच २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापराचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून मका, ऊस आणि इतर धान्ये वापरली जातात.

पेट्रोल निर्मात्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या इथेनॉल पैकी ५२ टक्के म्हणजे ४३१ कोटी लिटर इथेनॉल मक्यापासून बनवलेले असेल तर केवळ २२ टक्के इथेनॉल उसापासून तयार केले जाते. यावरून मक्याच्या चालू पणन वर्षातील मागणीचा अंदाज येऊ शकेल.

Tur Soybean
Tur Crop Threshing : खानदेशात आगाप तूर पिकाच्या मळणीस प्रारंभ

या पार्श्‍वभूमीवर मक्याच्या पुरवठ्याचे गणित लक्षात घेता भारतातून ३०-३५ लाख टन वार्षिक निर्यात या वर्षी झालेली नाही. तसेच अजूनपर्यंत ६-७ लाख टन मका आयात झाल्याची आकडेवारी दाखवत आहे. म्हणजे यातून निदान ४० लाख टन पुरवठा वाढला आहे. याव्यतिरिक्त २०-२५ लाख टन वाढ उत्पादनात होईल. म्हणजे कमीत कमी ६५ लाख टन पुरवठा वाढ दिसून येत आहे.

दुसरीकडे इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी १०-११ लाख टन मका लागेल असे गणित आहे. हे पाहता मक्याची बाजारपेठ मजबूत पायावर उभी असल्याचे दिसून येत असले तरी अलीकडेच एका माध्यमात असे म्हटले आहे, की देशातील मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या गाड्यांच्या इंजिनात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल स्वीकारण्याची तांत्रिक क्षमता नसल्यामुळे केंद्राला आपले इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २० टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणावे लागेल.

असे झाल्यास मक्याची मागणी अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकेल. याव्यतिरिक्त चालू रब्बी हंगामात देखील मक्याचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत. त्यातूनही अतिरिक्त पुरवठा वाढेल. यातून मागणी पुरवठ्यातील अंतर चांगलेच कमी होऊ शकेल, ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.

कडधान्य बाजार नरम

कडधान्य बाजार एकंदरीत माफक मंदीमध्ये असून पुढील काळात या मंदीमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ताज्या भाजीपाल्याच्या उतरलेल्या किमती हे यामागचे प्रमुख कारण असले, तरी मोठ्या प्रमाणावर होऊ घातलेली हरभऱ्याची आयात, यापूर्वीच आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्याचे मोठे साठे, खरिपातील मूग, उडदाची वाढती आवक आणि आता लवकरच सुरू होणारी नवीन तुरीची आवक या गोष्टी एकत्र आल्यामुळे ही हंगामी मंदी आलेली आहे.

दुसरीकडे पिवळ्या वाटाण्याच्या करमुक्त आयातीची अखेरची तारीख दोन महिन्यांनी वाढवण्याची शक्यता असल्याचे वृत्त माध्यमात आल्यामुळे मंदीला हातभार लागत आहे. तसेच रब्बी हंगामात हरभरा आणि मसूर या पिकांचे क्षेत्र वाढत आहे, ही गोष्ट देखील मंदीपूरक आहे.

ही परिस्थिती असली तरी तुरीच्या उत्पादना विषयक सरकारी आणि खासगी अंदाज पाहता तुरीतील मंदी अल्पकाळ आणि मर्यादितच राहील, अशी चिन्हे आहेत. तुरीच्या किमती हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यतादेखील कमीच आहे. उलट एप्रिलनंतर किंवा कदाचित त्यापूर्वीच तूर परत एकदा तेजीमध्ये जाण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकार अधिकाधिक बफर स्टॉक निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यातूनही किमतीला आधार मिळेल, असे एकंदर चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com