
Jalgaon News : खानदेशात आगाप किंवा जूनमध्ये लागवड केलेल्या पूर्वहंगामी किंवा बागायती तुरीची मळणी सुरू झाली आहे. मळणीसाठी मजूरटंचाई जाणवत असून, शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मळणी, झोडणीचे काम करून घेत आहेत.
खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर तूर पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर भागात अनेकांनी मुख्य पीक म्हणून जून, जुलैच्या सुरुवातीलाच ठिबकवर तुरीची लागवड केली होती.
पूर्वहंगामी तूर पिकातही मळणी सुरू झाली आहे. अनेकांनी जुलैत कोरडवाहू तुरीची लागवड केली होती. तुरीचे पीक सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी होते. परंतु अतिपावसात काहीसे नुकसानही झाले. काळ्या कसदार क्षेत्रात पीक काहीसे खराब झाले.
कोरडवाहू क्षेत्रातील तूर पीक बरे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आठवड्यातच तूर पिकाची कापणी करण्यात आली. अनेक शेतकरी खानदेशात तुरीची पारंपरिक पद्धतीने मळणी करतात. त्यात तूर कापणी करून ती दोन ते तीन दिवस वाळविण्यासाठी ठेवली जाते. यानंतर झोपणी करून शेंगांतील दाणे काढले जातात.
हे दाणे गोळा करून त्यांची शेतात उफणणी करून स्वच्छता केली जाते. मुख्य पीकधारक शेतकरी तुरीची कापणी करून मोठ्या ट्रॅक्टरचलित यंत्राच्या मदतीने मळणी करून घेत आहेत. यात तुरीची कापणी करण्यासंबंधी मजुरी व इतर मेहनत घ्यावी लागत आहे.
मळणीचे काम अलीकडेच सुरू झाले आहे. परंतु सध्या गावोगावी यात्रा-जत्रा व इतर शुभ कार्यक्रम आहेत. यामुळे मजूरटंचाई तूर मळणीसंबंधी जाणवत आहे. तूर मळणीसाठी कापणी व इतर बाबींवर एकरी तीन हजार रुपये खर्च येत आहे. तुरीची मळणी पुढे १५ ते २० दिवस सुरूच राहणार आहे.
उत्पादकता वेगवेगळी
तुरीवर रोगराईदेखील होती. ऑक्टोबरमध्ये अळ्या व किडींची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी घ्यावी लागली. काही भागात फुलोरा गळून पडला. तूर पिकाची मळणी अलीकडेच सुरू झाली आहे. यामुळे सरासरी उत्पादकता किती आहे, हे ठोसपणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पूर्वहंगामी तूर पिकात एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन येत आहे. कोरडवाहू पिकात अजून मळणी अनेक भागांत सुरू झालेली नसल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.